इंटरनेट भाग - ३

Category: इंटरनेट Published: Thursday, 21 April 2016

इंटरनेट व फॅक्स :-
इंटरनेटवरील इ मेल (इलेक्ट्नॅनिक मेल) आणि फॅक्स यांची तुलना केली. फॅकस कमी वेळात नियोजित स्थळी पाठविता येतो. इ मेल नेटवर्कवरील रहदारीवर अवलंबून असल्याने त्यास वेळ लागू शकतो. मात्र फॅक्ससाठी बराच खर्च येतो. एक पान माहितीसाठी भारतातल्या ठिकाणी १० रूपये तर अमेरिकेतील ठिकाणी त्यापेक्षा कितीतरी अधिक खर्च येतो. इ मेलसाठी फक्त फोनचा खर्च येत असल्याने तो नाममात्र असतो. फॅक्स ज्याला पाठवायचा त्यालाच तो मिळाला का दुसर्‍याने घेतला व फॅक्सचे उत्तर त्याने परत फॅक्स केला तरच मिळू शकते. इ मेल मात्र योग्य त्या माणसाच्या सांकेतिक क्रमांकावर जात असल्याने त्याच्याशिवाय दुसर्‍याला मिळत नाही. तो मिळाला की नाही ते लगेच कळू शकते व थोड्याच वेळात त्याचे उत्तरही आपल्या संगणकावर मिळू शकते. आपण ज्याला फॅक्स पाठविणार तो बाहेरगावी गेला असेल वा प्रवासात असेल तर त्याला फॅक्स मिळू शकत नाही. इ मेलमध्ये पत्ता म्हणजे एक सांकेतिक क्रमांक असल्याने तो कोठेही असला व त्याने कोणत्याही संगणकावर काम सुरू केले की इंटरनेटद्वारा त्याचा शोध घेतला जाऊन त्याला तो निरोप पोहोचू शकतो.
इ मेल :-
इंटरनेटवरून पाठविलेल्या माहितीवर गुप्तता ठेवणे कठीण असते. पुष्कळ वेळा इ मेलवरील माहितीवर नजर ठेवली जाते. अर्थात इंटरनेटवरून माहितीच्या देवाणघेवाणीचे प्रमाण एवढे प्रचंड आहे की असे लक्ष ठेवणे वा माहिती विना परवाना वापरणे या गोष्टी कठीण आहेत. तरीही खाजगी कंपन्याना इंटरनेटद्वारे आपली माहिती बाहेर फुटण्याचा धोका वाटतो. यासाठी त्यांच्याकडे संरक्षक व्यवस्था ठेवणारे प्रोग्रॅम (फायरवॉल सारखे) वापरले जातात. पुष्कळ कंपन्या सर्व माहिती विशिष्ट सांकेतिक पध्दतीने बदलून इंटरनेटवर सोडतात. ज्यांना ती सांकेतिक लिपी माहीत असेल त्यांनाच त्याची उकल होऊ शकते. संरक्षण, गुन्हा अन्वेषण, संशोधन संस्था अशाप्रकारे इंटरनेटवरून माहितीची देवाणघेवाण करतात.
इंटरनेटवरील काही माहिती प्रचार वा प्रसारासाठीच असते. बातम्या, राजकीय पक्षांचे जाहीरनामे, कंपन्यांच्या जाहिराती, वस्तूंच्या किंमती, देखभाल व दुरूस्ती, शिक्षण. ग्राहक सेवा, पर्यावरण संरक्षण इत्यादी अनेक प्रकारची माहिती कोणासही सहजपणे विनामूल्य मिळेल अशी व्यवस्था इंटरनेटवर करण्यात आलेली असल्याने शिक्षण, व्यापार, संस्कृती, राजकारण यांच्या प्रसारास ‘इंटरनेट’ हे महत्वाचे साधन झाले आहे. शिवाय इंटरनेट ही कोणा एकाची मालमत्ता नाही. जो कोणी इंटरनेटशी आपला संगणक जोडेल त्याचा तो हक्कदार होतो.

इंटरनेटवर खालील सेवा पुरविल्या जातात :-

१) इ मेल - माहितीची देवाण घेवाण- जगभरच्या मित्रांशी, सहकार्‍यांशी वा नातेवाईकांशी आपण संपर्क ठेवू शकतो.
२) जगातील कोणत्याही संगणकावर आपणास काम करता येते व तेथे आपले प्रोग्रॅम चालवून पहाता येतात.
३) आपल्या संशोधन प्रबंधासाठी वा व्यापार उद्योगासाठी आपण इंटरनेटचा उपयोग करून घेऊ शकता.
४) जगातील वृत्तपत्रे, मासिके, लायब्ररीतील पुस्तके, म्युझियम, संगीत यांचा लाभ मिळू शकतो.
५) करमणुकीसाठी नवीन साधने उपलब्ध होतात.