इंटरनेट भाग - १

Category: इंटरनेट Published: Thursday, 21 April 2016

प्रस्तावना :-
आजच्या युगात टेलिफोनचे महत्व अनन्यसाधारण आहे. पण त्यालाही मागे टाकण्याची किमया ‘इंटरनेट’ करीत आहे. नजिकच्या भविष्यकाळात इंटरनेट सर्वदूर पसरल्यानंतर संदेशवहनाचे तसेच इतर सर्व माहितीच्या देवाणघेवाणाचे ते एक महत्वाचे व कमी खर्चाचे साधन ठरणार आहे.
हे“इंटरनेट’ म्हणजे आहे तरी काय? तर संगणकाद्वारे संदेशवहन. आज संगणकाने सर्व क्षेत्रात व घराघरात प्रवेश मिळविला आहे. शब्द, चित्र वा संगीत कोणत्याही प्रकारची माहिती संगणक साठवून ठेवू शकतो. त्यावर पाहिजे ते संस्कार करू शकतो. एखाद्या ऑफिसात अनेक संगणक असल्यास ते एकमेकांना जोडून त्यांचे जाळे वा नेट तयार केलेले असते. त्यामुळे हे संगणक एकमेकांत संवाद साधू शकतात. जगभरातील अशी सर्व जाळी वा नेट एकमेकांशी जोडली की होते ‘इंटरनेट’
इतिहास :-
१९६९ साली इंटरनेटच्या कल्पनेचा जन्म झाला. अमेरिकन लष्कराने इंटरनेटच्या पायाभूत ठरणारे आर्पानेट नांवाचे नेटवर्क वापरात आणले. अमेरिकेला अशी भीती वाटे की संदेशवहनाचे मुख्य केंद्र जर रशियाने बॉम्ब टाकून नष्ट केले तर काय होणार ? या भीतीपोटी त्यांनी चार केंद्रे स्थापून ती एकमेकांना जोडली. हेतू हा की कोणतेही केंद्र नष्ट झाले तरी बाकीची तीन केंद्रे काम करू शकतील. हेच आर्पानेट. युध्द संपल्यानंतर अमेरिकेतील विद्यापीठांना अशा नेटवर्कचा उपयोग करण्याची मुभा देण्यात आली व आर्पानेटचा विस्तार झाला. नवीन संशोधन व माहितीची देवाणघेवाण या कामासाठी वापर सुरू झाल्यानंतर सर्व क्षेत्रातील लोकांचे याकडे लक्ष वेधले गेले आणि ‘इंटरनेट’ चा खर्‍या अर्थाने उपयोग सुरू झाला. १९६९ मध्ये ४ केंद्रे असणारे हे नेटवर्क १९९५ मध्ये ५० लाख केंद्रे असणार्‍या नेटवर्कमध्ये रूपांतरित झाले. आता इंटरनेटमध्ये लक्षावधी नेटवर्क असून आता ५० टक्के नेटवर्क अमेरिकेबाहेर इतर देशात आहेत. इंटरनेटमुळे जग खर्‍या अर्थाने जवळ आले आहे.