इंटरनेट भाग - २

Category: इंटरनेट Published: Thursday, 21 April 2016

इरनेट (ernet) :-
भारतात एज्युकेशन (e) आणि रिसर्च (r) यासाठी इरनेट १९८८ पासून कार्य करीत आहे. भारतातील सर्व आय.आय.टी., संशोधन संस्था व विज्ञान संस्था या इरनेटने एकमेकांशी जोडल्या गेल्या असून हे नेटवर्क अमेरिकेतील युयुनेटला जोडण्यात आले आहे. इरनेटचा उपयोग फक्त शिक्षण व संशोधन संस्थांना करता येतो.
व्ही.एस.एन.एल. (विदेश संचार निगम लि.) ने १९९४ मध्ये इंटरनेटसाठी निविदा मागविल्या. टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटने परदेशी निविदा रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना त्यात यश आले नाही. `कॉम्प्युसर्व्ह’ नावावर अमेरिकेतील एका कंपनीने इंटरनेटची सेवा देणे सुरू केले. आता भारतातील कोणालाही जागतिक इंटरनेटचा वापर करणे शक्य होऊ लागले आहे. व्ही.एस.एन.एल.ने स्वतंत्रपणे अशी सेवा (इंटरनेट अक्सेस सर्व्हीस) देणे सुरू केले.
व्ही.एस.एन.एल.चे मुख्य केंद्र मुंबई असून दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बंगलोर व पुणे ही भारतातील शहरे अमेरिकेतील इंटरनेटला जोडण्यात आली आहेत. इतरही शहरे हळुहळु या नेटवर्कला जोडली जाणार आहेत.
वापर पध्दती :-
इंटरनेटचा उपयोग करण्यासाठी संगणक, फोन याशिवाय त्या दोघांना जोडणारे मॉडेम नांवाचे उपकरण लागते. मॉडेमची क्षमता बॉड रेटमध्ये (बिट्स पर सेकंद) म्हणजे एका सेकंदात माहितीचे कण वहन करण्याची क्षमता यात दर्शविली जाते. जास्त बॉडचे उपकरण घेणे भविष्यातील प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक आहे.
इंटरनेट वरून तुम्हाला समजा माहिती पाठवायची असेल तर जेथे ती पाठवायची त्याचा सांकेतिक क्रमांक देऊन ती पाठवावी लागते. ही माहिती जशीच्या तशी न जाता आधी त्याचे छोट्या भागांत (पॅकेज) रूपांतर केले जाते हे भाग कमी जास्त लांबीचे असू शकतात. हे भाग रूटर नावाच्या विशिष्ट संगणकाद्वारे एका नेट वरून दुसर्‍या नेटवर असे करत योग्य पत्त्यावर पाठविले जातात. (जणू काही वेगवेगळया बॅगांमधून पाठविलेले सामान) ज्या ज्या ठिकाणाहून भाग घेतले वा पाठविले जातात तेथे अनेक मार्गांनी माहितीची पाकिटे येत असतात. ज्या ठिकाणी जायचे त्यासाठी देखील अनेक मार्ग उपलब्ध असतात. त्यामुळे कोणत्या मार्गावर रहदारी कमी आहे व वेळ कमी लागेल याचा विचार करून प्रत्येक पॅकेज पाठविले जाते. हे सर्व अतिशय वेगात चालत असल्याने वेगवेगळया मार्गाने प्रवास करूनही हे भाग अत्यल्प वेळात मुक्कामी पोचतात. त्याचवेळी इतर ठिकाणहून माहिती येत असल्यास त्याचा क्रम लावला जातो. व पोस्ट बॉक्ससारखी त्या संगणाकावर सर्व माहिती साठवून ठेवली जाते. म्हणजे रोज कामाला सुरूवात करण्यापूर्वी कोणाकोणाची पत्रे आली आहेत ते ही पोस्ट बॉक्स उघडून पाहता येते. ज्या ठिकाणी माहिती जावयाची तेथे दुसरे काम चालू असल्यास मध्येच तातडीची खिडकी पडद्यावर येऊन माहिती आल्याची सूचनाही दिली जाऊ शकते.