ड्रीमव्हीवरच्या साहाय्याने वेबपेज डिझाईन. भाग - १

Category: साध्या वेबसाईटचे डिझाईन Published: Thursday, 20 October 2016

साध्या नोटपॅडच्या साहाय्याने एचटीएमएल टॅग वापरून वेबपेज कसे तयार करता येते हे आपण पाहिले. असे वेबपेज करताना एचटीएमएल टॅगची पूर्ण माहिती असणे आवश्यक असते. मात्र वेबपेज डिझाईनसाठी ड्रीमव्हीवर किंवा फ्रंटपेजसारख्या सुविधांचा वापर केल्यास कोणतेही हार्ड कोडींग न करता केवळ डिझाईन टूल्सचा वापर करून वेब पेज तयार करता येते. व्यावसायिक वेब डिझाय़नर सहसा अशा सुविधेचा वापर करतात. त्यात त्यांचा बराचसा वेळ वाचतो. तुम्ही म्हणाल मग एचटीएमएल टॅग वापरून वेबपेज कसे तयार करता येते हे शिकण्याची गरजच काय?

येथे ही गोष्ट लक्षात ठेवणे जरूर आहे की एचटीएमएल टॅगची पूर्ण माहिती असेल तर ड्रीमव्हीवरसारख्या सुविधा वापरताना त्यावर पूर्ण अवलंबून रहावे लागत नाही व एचटीएमएल कोडमध्ये बदल करून डिझाईनमधील राहिलेल्या उणिवा वा चुका त्वरित दुरुस्त करता येतात. एकदा वेबपेज डिझाईन सुविधा वापरण्याची सवय लागली की एचटीएमएल टॅग शिकण्यात उत्साह रहात नाही यासाठी वेबपेज डिझाईनचे शिक्षण देताना प्रथम एचटीएमएल टॅग वापरून वेबपेज कसे तयार करावयाचे हे शिकविले जाते.

फ्रंटपेज ही मायक्रोसॉफ्ट कंपनीने विकसित केलेली वेबडिझाईन सुविधा असून ती एम एस ऑफिसमध्ये अंतर्भूत असते. ड्रीमव्हीवर ही अडोब ( पूर्वी मॅक्रोमिडियाचे) कंपनीने विकसित केलेली वेबडिझाईन सुविधा असून अडोबच्या संकेतस्थळावरून मिळविता येते.

मॅक्रोमिडिया ड्रीमव्हीवर ८ चा स्क्रीन खाली दाखविला आहे.

यात तीन रकाने आहेत. पहिल्या रकान्यात पूर्वीच्या फाइल्सची यादी असून त्यातून कोणतीही फाईल उघडता येते. मधल्या रकान्यात कोणकोणत्या प्रकारच्या वेबपेज फाईलसाठी ही सुविधा वापरता येते याची यादी असून त्यातील योग्य तो प्रकार निवडता येतो. यात साधे एचटीएमएल पेज, एएसपी, पीएचपी, सीएसएस सारखे पर्याय आहेत.तिसर्‍या रकान्यात वेबपेजच्या तयार नमुन्यांचा उपयोग करून वेबपेज करण्यासाठी पर्याय दिले आहेत. 

खालच्या पट्टीत ड्रीमव्हीवर नवीन वापरणार्‍यांसाठी ट्यूटोरियल व ड्रीमव्हीवरविषयी अधिक माहिती पाहण्याची सोय आहे.

आपण मधल्या रकान्यातून नवे एचटीएमएल पेजचा पर्याय निवडला की खालील प्रकारचे पान उघडते.

आपण बेसिक पेज एचटीएमएल हा पर्याय निवडला की ड्रीमव्हीवरच्या डिझाईनचे मुख्य पान उघडते.