XML ( एक्सएमएल) भाग -१

Category: XML ( एक्सएमएल) Published: Wednesday, 26 October 2016

XML म्हणजे eXtensible Markup Language ( वाढविता यॆणारा व प्रत्येक माहिती एककासाठी  सूचक चिन्हे असणारा माहिती कोष)

डाटाबेसमध्ये माहिती साठविण्यासाठी अनेक टेबल किंवा तक्ते असतात. त्यातील प्रत्येक ओळीत एक रेकॉर्ड असते. तेथे विविध रकान्यांमध्ये योग्य त्याप्रकारची माहिती भरलेली असते. त्यामुळे डाटाबेसचा वापर केल्यास आपल्याला हव्या त्या रेकॉर्डमधील हवी ती माहिती वा अशा माहितीचा संच चटकन मिळविता येतो. मात्र यासाठी डाटाबेस व  डाटा वाचणारे विशिष्ठ प्रोग्रॅम वापरावे लागतात.

XML मध्ये डाटाबेसप्रमाणेच माहिती वर्गीकरण करून ठेवता येते व त्यातील कोणतीही  माहिती वा अशा माहितीचा संच आपणास मिळविता येतो. शिवाय याची रचना अगदी साधी असून साध्या नोटपॅडच्या साहाय्यानेही आपल्याला एक्सएमएल फाईल बनविता येते.

एक्सएमएल फाईलच्या सुरुवातीस <?xml version="1.0"?> लिहिले की पुढील माहिती  एक्सएमएल स्वरुपात आहे हे कॉम्प्युटरला समजते. व त्या माहितीचे पृथ:करण त्याला टॅगच्या साहाय्याने करता येते.
उदाहरणार्थ खालील xml फाईल पहा.
-------------- 
<?xml version="1.0" ?>
<Websites>
    <Website> 
        <name>www.dnyandeep.net</name>
        <description>Dnyandeep Foundation main  website</description>
        </Website>
    <Website><name>www.mymarathi.com</name>
        <description>Marathi literature and Maharashtra information in Marathi</description>
        </Website>
    <Website><name>www.sanskritdeepika.org</name>
        <description>Sanskrit Dictionary, Grammar with audio clips </description>
        </Website>
 </Websites>
------------- 
 यात पहिल्या टॅगचा प्रारंभ <Websites> हा आहे व त्याचा शेवट फाईलच्या शेवटी </Websites> ने केला आहे.  Websites हा टॅग एकदाच आला आहे. त्यात तीन  Website टॅग्स आहेत. प्रत्येक Website टॅगमध्ये name आणि description हे टॅग्स आहेत व त्यात प्रत्यक्ष माहिती आहे.

 म्हणजे Websites नावाच्या डाटाबेस टेबलमधील प्रत्येक ओळ म्हणजे Website  टॅग व प्रत्येक ओळीत name आणि description या नावांच्या दोन फील्डमध्ये ( रकान्यांमध्ये) प्रत्यक्ष माहिती अशा स्वरुपातही ह्या websites.xml या फाईलची रचना समजता येईल.