ओझोनच्या थरातील घट

Category: Environment & Green Technology Published: Thursday, 20 October 2016

प्रास्तविक - पृथ्वीवरील वातावरण हा पर्यावरणाचा सर्वात गतीमान घटक आहे. वातावरणातील घटक, त्याचे तापमान आणि स्वयंशुद्धीकरण क्षमता यात पृथ्वीच्या जन्मापासून सतत बदल घडत आले आहेत. तरीदेखील मानवी इतिहासाच्या कालखंडातील या बदलाची गती गेल्या दोन शतकांत पूर्वी कधी नव्हती एवढी जास्त वाढली आहे.
हवा प्रदूषण 
पावसाच्या पाण्याबरोबर आम्ल (अ‍ॅसिड) येणे व त्यामुळे सजीव सृष्टी व इतर साधनसंपत्तीवर विपरित परिणाम होणे, शहरातील विषारी धुके(SMOG), हरित गृह परिणाम ( ग्रीन हाऊस इफेक्ट) आणि स्ट्रॅटोस्फिअरमधील ओझोनचा थर कमी होणे ही त्यातली काही उदाहरणे होत. 
हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण सोडले तर हवेतील ९९.९ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाण नायट्रोजन, ऑक्सिजन व इतर पूर्णपणे निष्क्रीय असणार्‍या वायूंचे असते व हे प्रमाण मनुष्यप्राण्याच्या जन्मापासूनच्या इतिहासात कायम राहिलेले दिसते. याचा अर्थ असा की हवेतील अत्यल्प प्रमाणात असणार्‍या दूषित वायूंच्या प्रमाणात वाढ झाल्याने हवा प्रदूषण होते. या वायूंमध्ये सल्फर डाय ऑक्साईड(SO2), नायट्रोजन ऑक्साईड्स ( ज्याना एकत्रितपणे एनोएक्स NOx म्हटले जाते ), नायट्रिक ऑक्साईड व नायट्रोजन डाय ऑक्साईड आणि अनेक प्रकारची क्लोरोफ्लोरोकार्बन संयुगे यांचा मुखत्वे समावेश होतो.
ओझोनच्या थरात घट 
या दशकात पृथ्वीभोवतालच्या वातावरणातील ओझोनच्या थरात घट होणे हे नवे संकट निर्माण झाले असून त्यामुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या अस्तित्वासच धोका पोहोचण्याची शक्यता आहे हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे.

पृथ्वीच्या वातावरणात ट्रोपोस्फिअर, स्टॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर व एक्झोस्फिअर असे थर असतात. 

त्यातील स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ओझोन वायूचे प्रमाण जास्त आढळते. या वायूमुळे हानीकारक वैश्विक किरण ( मुख्यत्वे अल्ट्राव्हायोलेट किरण) थोपविले जात असल्याने ते जमिनीवर पोहोचू शकत नाहीत. या थराची जाडी कमी झाली तर हे किरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्याचे प्रमाण वाढेल व त्यामुळे सजीव सृष्टीस धोका पोहोचेल अशी शास्त्रज्ञांना भीती वाटते.ब्रिटीश अंटार्टिक सर्व्हेच्या शास्त्रज्ञांनी १९८५ मध्ये अंटार्टिकावरील ओझोनच्या थराला भोक असल्याचे ( तेथील थराची जाडी कमी असल्याचे) शोधून काढले.

ओझोनच्या थरात घट होण्याची कारणे
हवा प्रदूषणास कारणीभूत असणारे वायू ओझोनचे विघटन करतात असे आढळून आले आहे. यात क्लोरोफ्लोरोकार्बन संयुगे, विशेषतः CFC-11 (CFCL3) आणि CFC-12(CFCl2) ही संयुगे यांचा समावेश होतो.गेल्या काही दशकात अतिसूक्ष्म थेंबांच्या स्वरुपातील सुवासिक द्रव्ये, फेस निर्माण करणारी रसायने तयार करण्यासाठी या संयुगांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेला.शीतकामध्ये बाष्पशील वायू म्हणूनही फ्रिऑनचा वापर करण्यात आला. यांचा प्रत्यक्ष सजीव सृष्टीवर कोणताही दुष्परिणाम होत नाही मात्र ही संयुगे हवेतील मिश्रणामुळे स्ट्रॅटोस्फिअरमध्ये पोचली की तीव्र अल्ट्राव्हायोलेट किरणांचा त्यांच्यावर मारा होऊन त्यांचे विघटन होते ClOx आणि BrOx हे रॅडिकल तयार होतात व त्यातून क्लोरीन वायू सुटा होतो.क्लोरीन ओझोनचे विघटन होऊन त्याचे ऑक्सिजन मध्ये रुपांतर हॊण्यास साहाय्यक ठरतो. क्लोरीन वायू तसाच राहिल्याने एका क्लोरीनच्या अणुमुळे हजारो ओझोन रेणूंचे ऑक्सिजनमध्ये रुपांतर होते. ओझोनचे विघटन करणार्‍या या क्लोरिनेटेड संयुगांचे स्ट्रॅटोस्फिअरमधील प्रमाण पूर्वीच्या मानाने ४ ते ५ पटीने वाढले आहे व त्यात दरवर्षी ५ टक्क्यांनी वाढ होत आहे. 
ओझोनच्या थरातील घट - दुष्परिणाम
जर ही स्थिती अशीच चालू राहिली तर नजिकच्या भविष्यकाळात अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे वनस्पती व प्राणीमात्रांवर त्याचा विपरित परिणाम होईल. अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेच्या कॅन्सरचे प्रमाण वाढेल. 

याशिवाय अल्ट्राव्हायोलेट किरण शोषले न गेल्याने उष्णता निर्माण होण्याची क्रिया थांबेल त्यामुळे वातावरण थराच्या तापमानात घट होऊन त्याचा परिणाम वातावरणातील वार्‍यांच्या दिशा व गतीवर हॊईल. सूनामीसारखी संकटे वाढलील व शेवटी सार्‍या जीवसृष्टीचा सर्वनाश होईल.