स्वच्छ भारत - व्याप्ती आणि संधी

Category: Environment & Green Technology Published: Friday, 21 October 2016

भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदी यांनी  आपल्या देशात ‘स्वच्छ भारत’ हे जन आंदोलन सुरू करून एक स्वागतार्ह पाउल उचलले आहे. या आंदोलनात सर्वसामान्यांना ‘कचरा सफाई’ हे मुख्य उद्दिष्ट दिसत असले तरी असले तरी स्वच्छ भारत या संकल्पनेची व्याप्ती फार मोठी आहे.

 

कचरा सफाईमध्ये झाडू वापरून कचरा एकत्र गोळा केला तरी त्या कचर्‍या्वर  योग्य प्रक्रिया करून त्यातील  उपयुक्त घटकांचा पुनर्वापर, खत वा उर्जा निर्मिती वा घातक पदार्थांचा निर्धोक पद्धतीने विनियोग करणे याही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. अन्यथा या साठलेल्या कचर्‍यापासून पर्यावरणाचे प्रदूषण होऊन समस्या अधिक गंभीर होऊ शकते.

 

खरे पाहता हवा, पाणी व जमीन प्रदूषणास कारणीभूत ठरणार्‍या सर्व कारणांचे निराकरण करून आपले पर्यावरण स्वच्छ व उच्च दर्जाचे राखण्यासाठी कराव्या लागणार्‍या सर्व कार्याचा समावेश ‘स्वच्छ भारत’ या संकल्पनेत आहे. जमिनीवरील कचरा आपल्याला दिसतो परंतु पाणी व हवा यात मिसळणारे दूषित पदार्थ प्रत्यक्ष दिसले नाहीत तरी ते तेवढेच हानीकारक असतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आता असे प्रदूषण होऊ नये म्हणून आपल्या मानसिकतेत व जीवनशैलीत प्रयत्नपूर्वक बदल करणे  अत्यावश्यक आहे.

 

घन कचरा व्यवस्थापन तसेच जलप्रदूषण  व हवाप्रदूषण यांचे नियंत्रण व निराकरण करण्यासाठी योग्य ते  तंत्रज्ञान विकसित करणे, त्यासाठी लागणार्‍या साधनसुविधांची निर्मिती करणे, प्रदूषण नियंत्रणाचे कार्य सुव्यवस्थित चालविण्याचे प्रशिक्षण देणे अशा अनेक वस्तु  व रोजगारनिर्मितीच्या संधी आता ‘स्वच्छ भारत’ या आंदोलनामुळे  नजिकच्या भविष्यकाळात  भारतातील युवावर्गास उपलब्ध होणार आहेत.

 

 भारत सरकारने ‘मेक इन इंडिया’ हे विकासाचे ध्येय ठरविले असल्याने विकसित राष्ट्रांकडून तंत्रज्ञान वा यंत्रसामुग्री आयात न करता प्रदूषण नियंत्रणासाठी फक्त भांडवल गुंतविण्याची अपेक्षा ठेवून आपल्या देशात असे तंत्रज्ञान व लागणारी यंत्रसामुग्री विकसित करण्याचे बंधन परकीय गुंतवणूकदार कंपन्यांवर टाकण्याची गरज आहे.

 

 असे झाले नाही तर परकीय तंत्रज्ञान व परकीय यंत्रसामुग्री यांची आयात होऊन या क्षेत्रात परावलंबित्व वाढून उद्योग विकासाची व रोजगार निर्मितीची संधी आपण गमावून बसू.

 

सुदैवाने भारतात अशा तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे. तज्ज्ञ सल्लागारांचीही वानवा नाही. उणीव आहे ती फक्त या क्षेत्रात आवश्यक यंत्र सामुग्रीचे उत्पादन करण्यासाठी लागणार्‍या  भांडवलाची व प्रदूषण नियंत्रणाबाबत जनता व उद्योग यांच्या उदासीन वृत्तीवर मात करण्याची.

 

‘स्वच्छ भारत’ योजनेत  समाजाच्या विविध घटकांचा सहभाग घेतांना त्यांच्या व्यवसाय व शिक्षण कौशल्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे.

 

इंजिनीअरिंग क्षेत्रातील व्यक्तींचा उपयोग सर्वेक्षण, प्रकल्प डिझाईन, प्रक्रिया संशोधन व व्यवस्थापन या कामासाठी, सामाजिक व शैक्षणिक संस्थांचा शिक्षण व जन सहभाग वाढविण्यासाठी, आरोग्यविभागातील लोकांचा रोगप्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापर केला तर हे अभियान अधिक प्रभावीपणे यशस्वी करता येईल.