आकर्षक वेबसाईटसाठी फ्लॅश(Flash) तंत्रज्ञान

वेबसाईटवर गद्य मजकुरापेक्षा चित्रे चटकन्‌ लक्ष वेधून घेतात. हलती चित्रे असल्यास वेबसाईटच्या आकर्षकतेत अधिकच भर पडते. फ्लॅश तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपल्याला अशी चित्रे वा ध्वनी-चित्रफिती बनविता येतात.यामुळे बहुधा जाहिरातींसाठी फ्लॅशचा वापर करण्यात येतो.

मॅक्रोमिडिया या कंपनीने वेबसाईट डिझाईनसाठी फ्लॅश, ड्रीमव्हीवर व फायरवर्क्स यांचा विकास केला. आता ती कंपनी फोटोशॉप व अ‍ॅक्रोबॅट रीडर बनविणार्‍या अडॊब कंपनीत विलीन झाली आहे.

फ्लॅश ५ पासून सुरुवात झालेले तंत्रज्ञान आता फार प्रगत झाले असून त्याच्या फ्लॅश १० पर्यंत सुधारित आवृत्या निघाल्या. त्यातून फ्लेक्स या आधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती झाली आहे.

फ्लॅश तंत्रज्ञानाचा परिचय

फ्लॅशमध्ये चित्रे काढण्यासाठी एक स्टेज (फलक) असते. काढलेली चित्रे वेगवेगळ्या लेअर्सवर (पातळ्यांवर) साठवून ठेवता येतात व त्यांची एकावर एक रचना करता येते. पारदर्शक कागदांवर वेगवेगळी चित्रे काढून व त्यांचा गठ्ठा करून सर्वसमावेशक एकच चित्र करता येते तशीच ही सोय असते. 


याशिवाय स्टेजच्या वरच्या बाजूला टाईमलाईन दिसते. त्याच्यावर अनेक फ्रेम्स (चित्रचौकटी) आपण तयार करू शकतो.प्रत्येक फ्रेममध्ये अनेक लेअर्सचे चित्र असते.अशी चित्रे अनेक फ्रेम्समध्ये घातली की त्यांची एक चित्रफीत तयार होते. चित्रफीत तयार करण्याच्या या फाईलला .fla हे दुय्यम नाव असते. ही फाईल फ्लॅश मुव्ही (.swf हे दुय्यम नाव) म्हणून एक्स्पोर्ट केली की चित्रफीत कार्यान्वित होते. वेबपेजमध्ये याचा समावेश केला की ही चित्रफीत दिसू लागते. मात्र त्यासाठी कॉम्प्युटरवर फ्लॅश प्लेअर असावा लागतो. अन्यथा इंटरनेटवरून तो डाऊनलोड होऊन फ्लॅश मुव्ही दिसण्याची व्यवस्था वेबपेजच्या प्रोग्रॅममध्ये केलेली असते.