मुंगी उडाली आकाशी

संत मुक्ताबाईंनी ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी’ अशी  अशक्यप्राय असणारी उपमा आपल्या अभंगात दिली होती . मात्र सध्याच्या तंत्रज्ञान युगात ही कल्पना भावार्थाने प्रत्यक्षात आलेली दिसत आहे. अगदी छोट्या मोबाईलच्या साहाय्याने क्लाऊडसारख्या  सर्वदूर माहितीसाठ्याचा उपयोग करून सर्व जगातील ज्ञानभांडाराचा शोध घेण्याची वा त्यात बदल करण्याची क्षमता मानवाने हस्तगत केली आहे.

 

माहितीतंत्रज्ञान क्षेत्रात एकाचवेळी अतिशय लहान सिलिकॉन पट्टीमध्ये (चिपमध्ये)   महासंगणकीय सामर्थ्य निर्माण करण्याचे व लाखो कॉम्प्युटर्स एकत्रितपणे वापरून क्लाऊडसारख्या अतिविशाल व वेगवान संगणक सर्वांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे संशोधन चालू आहे. मोबाईलसारख्या वा त्याहूनही लहान साधनाद्वारे अशा विश्वव्यापी संगणकाशी संपर्क साधण्याचे कार्य आता अगदी सुलभ झाले आहे.  तेथे आपला माहिती साठा सुरक्षितपणे जतन करण्याची  वा त्या संगणकक्षमतेचा वापर करून कोणत्याही जटील व गुंतागुंतीच्या समस्येचे उत्तर काढण्याची सुविधा आपल्या हातातील मोबाईलचा उपयोग करून वापरता येणार आहे.

 

आपंण लहानपणी अल्लाउद्दीन व जादूचा दिवा ही गोष्ट वाचलेली असेल. तो दिवा घासला की कोणतेही काम करण्यास तयार असलेला मायावी राक्षस अल्लाउद्दीनच्या सेवेस हजर होत असे. तशीच काहीशी किमया आता मोबाईल स्वरुपात प्रत्येकाच्या हातात आली आहे. त्याचा योग्य उपयोग केला तर मानवाला भेडसावणार्‍या अनेक समस्यांचे समाधानकारक निराकरण होणे शक्य झाले आहे.

 

आतापर्यंत सर्व संगणकीय कामासाठी स्वतःकडे कॉम्प्युटर असणे आवश्यक होते. ही गरज आता उरणार नाही. क्लाउडमार्फत मिळणारी सेवा ही भाडेतत्वावर दिली जात असल्याने आपल्याला आवश्यकता असेल तेव्हाच व तेवढ्याच वेळेसाठी ही सेवा आपण वापरू शकता. साहजिकच कॉम्प्युटर्सची व सॉफ्टवेअरची खरेदी, त्यांची देखभाल यांचा खर्च करावा लागणार नाही. शिवाय ही सेवा इंटरनेटद्वारे जगात कोठेही उपलब्ध होत असल्याने स्थानिक मर्यादा त्यास लागू पडत नाहीत.

 

यामुळेच लहान, मोठे उद्योग आता आपल्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटर विभाग ठेवण्याऎवजी क्लाउड सेवेचा वापर सुरू करण्याचा गांभिर्याने विचार करू  लागले आहेत. अर्थात अजून बर्‍याच लोकांना क्लाउड सेवेची फारशी माहिती नसल्याने तसेच माहितीच्या सुरक्षेविषयी शंका असल्याने सुरुवातीच्या काळात अशा बदलाचा वेग थोडा कमी राहील. मात्र एकदा का या पर्यायी व्यवस्थेचे फायदे लोकांच्या ध्यानात आले की सध्याच्या कॉम्प्युटर वापराच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र क्रांती घडेल.

 

 ज्याप्रमाणे प्रत्येक ऑफिसमधून टाईपरायटरचे उच्चाटन झाले त्याप्रमाणे भविष्यात डेस्कटॉप कॉम्प्युटर्स व तदनुषंगिक साधने बाजारातून अदृश्य होतील व आवश्यक संगणकीय कार्यक्षमता प्रत्येक माणसाच्या मुठीतील मोबाईल वा टॅबमध्ये राहील.