नेट्द्वारे शिक्षणासाठी मुडल सिस्टीम भाग - ३

मुडल शिक्षण प्रणाली पीएचपी (PHP) व मायएसक्यूएल(MySQL) यांचा वापर करून विकसित केली असून  www.moodle.org मुडलच्या अधिकृत संकेतस्थळावरून (official website) डाऊनलोड करून दूरस्थ सर्व्हरवर अगदी सुलभ पद्धतीने स्थापित करता येते. त्याची नोंदणी करणे बंधन कारक नाही. त्यातील सर्व प्रोग्रॅम व डाटाबेसमधील टेबल पाहता व हवे तसे बदलता येत असल्याने आवश्यकतेनुसार फेरबदल करणे वा नवे प्रोग्रॅम त्याला जोडणे शक्य असते. मुडल वेबसाईटचे मुख्य प्रवेशदालन वा फ्रंटपेज आपल्याला हवे तसे डिझाईन करता येते. त्यातून प्रत्यक्ष मुडल व्यवस्थेत  प्रवेश करण्यासाठी प्रवेश नोंदणी ( login registration) करणे आवश्यक असते. 

 

मुडल शिक्षण प्रणालीत सतत संशोधन होत असून नियमितपणे त्याच्या नव्या सुधारित आवृत्त्या मुडलच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होत असतात. सध्या सर्वात नवी आवृत्ती moodle 2.6 असून त्यात अनेक आधुनिक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र अजून बर्‍याच जुन्या ब्राउजरवर ही नवी आवृत्ती चालू शकत नसल्याने ज्ञानदीपने ऑनलाईन कोर्सेससाठी आपल्या सर्व्हरवर moodle1.9 ही प्रणाली स्थापित केली आहे. त्याची लिंक

http://www.dnyandeep.net/webmaster

ही आहे.

 

मुडलची रचना –

मुडलची रचना एखाद्या शिक्षण संस्थेसारखी असते. शिक्षण संस्थेत व्यवस्थापक ( प्राचार्य वा मुख्याध्यापक), शिक्षक, विद्यार्थी मुख्य घटक असतात व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार  विविध विषयांचे ज्ञान देणे  हे शिक्षण संस्थेचे कार्य असते. मुडलचेही कार्य  असे अभ्यासक्रम शिकविण्याची व्यवस्था करणे हे असते. प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमासाठी शिक्षक नियुक्त करणे, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम निवडण्याची मुभा देणे व शिक्षणसुविधा देणे व सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणे याचे  अधिकार   मुडल शिक्षण प्रणालीत व्यवस्थापकास (Administrator) दिलेले असतात. 

 

मुडलमध्ये प्रवेश घेताना शिक्षक  वा विद्यार्थी असा भेदभाव नसतो. प्रवेश झाल्यावर व्यवस्थापक युजरला त्याच्या इच्छेनुसार विशिष्ट अभ्यासक्रमासाठी शिक्षक वा विद्यार्थ्याचा दर्जा बहाल करतो. हा दर्जा मिळाल्यावर त्या युजरला वेबसाईटवरील फक्त त्याच्याशी संबंधित माहिती व अधिकार यांचा वापर करण्याची सुविधा मिळते. यामुळे माहिती व व्यवस्था सुरक्षित राहते. मुडल शिक्षण प्रणाली असणार्‍या  वेबसाई्टवर सर्वांना (login केलेले नसल्यास) केवळ उपलब्ध अभ्यासक्रम पाहता येतात.