भारतापुढील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख आव्हाने

भारत हा विकसनशील देश असून लोकसंख्येत तॊ जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. प्राचीन काळी ‘भारतात सोन्याचा धूर निघत असे’ असे म्हटले जात असले तरी आधी मोंगलांच्या चढायांमुळे व नंतर दीडशे वर्षे ब्रिटीश गुलामगिरीत रहावे लागल्याने येथील आर्थिक स्थिती फार खालावलेली आहे. भारत सरकारवर परदेशी कर्जाचे डॊगर आहेत. वाढती लोकसंख्या, गरिबी, अंधश्रद्धा, जातीभेद, भाषाभेद, अज्ञान अशा विविध समस्यांनी भारताची प्रगती रोखून ठेवली आहे. त्यातच परकीय आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या आर्थिक सत्तेच्या जोरावर येथील स्थानिक बाजारात आपले बस्तान बसवित आहेत. राजकीय अस्थिरता, भ्रष्टाचार, अंतर्गत व सीमेपलीकडून होणारा हिंसाचार यांनी लोकशाहीलाच धोका पोहोचत आहे.

 

यावर प्रभावी उपाय शोधण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने व एकात्म भावाने प्रयत्न करण्याची गरज आहे.सुदैवाने आपली बौद्धीक संपदा अपार आहे. त्यात या समस्यावर मात करण्याचे सामर्थ्य निश्चितच आहे. गरज आहे ती ध्येय निश्चितीची व या बौद्धीक संपदेस हे कार्य करण्याची संधी मिळण्याची.

 

सर्वप्रथम शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, व्यापार अशा विविध क्षेत्रातील प्रगतीसाठी कामांची प्राथमिकता निश्चित करणे व त्यासाठी कालमर्यादा, मनुष्यबळ, आर्थिक साहाय्य यांचे नियोजन करणे आवश्यक आहे.

 

स्व. राजीव गांधी यांनी आयटी तज्ज्ञ सॅम पित्रोदा यांच्यावर अशीच जबाबदारी टाकली होती. आता भारत सरकारने आयटी क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ श्री नंदन निलेकाणी यांच्याकडे आधार योजनेचे काम सोपविले. तसेच इन्फोसिसचे अध्वर्यु डॉ. नारायण मूर्ती यांना गुजराथ सरकारने नियोजनबद्ध विकासासाठी निमंत्रित केले या घटना आयटी क्षेत्राच्या वाढत्या सहभागाच्या द्योतक आहेत.

 

मात्र केवळ व्यक्तीगत मार्गदर्शक न नेमता भारतातील मोठ्या आयटी कंपन्यांना प्रकल्प योजना व उभारणीचे काम प्राधान्य क्रमाने देऊन भारतात उपलब्ध असणार्‍या बौद्धिक संपदेचा भारताच्या विकासासाठी उपयोग करणॆ अत्यावश्यक आहे.

 

भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. वैश्विक ज्ञानाचा साठा इंटरनेटवर प्रामुख्याने इंग्रजी भाषेत उपलब्ध असल्याने बहुतांश जनतेपर्यंत तो पोहोचत नाही यासाठी आय टी कंपन्यांना भारतीय भाषांत हे ज्ञान आणण्यासाठी उद्युक्त करण्याची गरज आहे. आज गुगल, याहू व मायक्रोसॉफ्ट असे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर करीत आहे. मात्र त्यांचा त्यामागील उद्देश येथील ग्राहक बाजारावर नियंत्रण मिळविणे हा असल्याने त्याचा परदेशी उत्पादक व सेवा पुरविणार्‍या कंपन्यांना फायदा होणार आहे.

 

आयटी कुशल कर्मचारी भारताचा सर्व भागात, उपलब्ध व्हावेत. त्याना शहराकडे धावण्याचा मोह होणार नाही अशा प्रकारे रोजगारनिर्मिती करण्याची आवश्यकता आहे. सध्या अशा व्यक्तींना शहराशिवाय रोजगार मिळणेही मुष्कील होत आहे.असे शिकलेले लोक शहरात गेले की ग्रामीण छोट्या गावात आयटी शिक्षित व्यक्तींचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीचा ग्रामीण विकसासाठी वा तेथील समस्या सोडाविण्यासाठी काहीही उपयोग होत नाही. शिवाय मोठ्या शहरांच्या समस्याही अशा शहरीकरणामुळे वाढत आहेत. घरांचे भाव गगनाला भिडले आहेत.शहरी सुविधांवर व दळणवळण व्यवस्थेवर तसेच पर्यावरण दर्जावर याचा प्रचंड ताण पडत आहे.

 

या सर्व समस्या विकेंद्रित विकासाने सुटू शकतील व हे विकेंद्रीकरण सर्वप्रथम आयटी क्षेत्राचे व्हावयास हवे व ते शासनाने घडवून आणणे आवश्यक आहे. असे झाले तर ग्रामीण व्यवस्थेत व अन्नधान्य उत्पादनात बिघाड न होता सर्व क्षेत्राचा विकास होईल. घरातील महिला वर्गाला नवा रोजगार उपलब्ध होईल. व भारताचे सर्वंकष प्रगतीचे लक्ष्य माहिती तंत्रज्ञानाच्या या क्रांतीने साध्य होईल. आमच्या ज्ञानदीप फौंडेशनने सर्व शाळा कॉलेजात या माहिती तंत्रज्ञान प्रसारासाठी ज्ञानदीप मंडळे स्थापन करण्याचे व माहिती तंत्रज्ञानाचे विकेंद्रीकरण करण्याचे योजिले आहे. नव्या वर्षातील ह्या ज्ञानदीपच्या उपक्रमास सर्वांचे सक्रीय सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे.