My Marathi
- माय मराठी
मानवी जीवनाचा साहित्य व संस्कृती हा महत्वाचा वारसा आहे व भाषा त्यासाठी अत्यावश्यक माध्यम आहे. महाराष्ट्रीयनांसाठी तर मराठी भाषा ही जीवापाड जपण्यासारखी गोष्ट आहे. महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी लोकांना यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. भोवतालची परिस्थिती व नेहमीच्या व्यवहारासाठी लागणारी स्थानिक भाषा यामुळे यात अनेक अडचणी येतात.
आपल्या पुढील पिढ्यांमध्ये मराठी भाषा व संस्कृती टिकून रहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र मुलांना मराठी शिकविण्यासाठी वेळ मिळत नाही. मराठी शाळा, पुस्तके वा शिक्षक नसतात. मराठी मासिके व पुस्तकेही मिळत नाहीत. घरातही मराठीऎवजी दुसरी भाषा वापरण्याची सवय लागते व हळू हळू मराठीपासून मुले दूर होऊ लागतात. त्यांचा मराठी संस्कृतीशी असणारा संपर्क तुटत जातो. पालकांनी मराठी बोलण्याचा कटक्ष ठेवला तर मुलांना मराठी समजते थोडे बोलताही येऊ लागते. मात्र वाचणे वा लिहिणे यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. अशा मुलांसाठी प्रभावी दृकश्राव्य माध्यमाची गरज आहे.
परप्रांतांत वा परदेशात स्थायिक झालेल्या आपल्या मुलांकडे जाणाऱ्या व नेहमी मराठी मासिके व पुस्तके वाचणाऱ्या मराठी मंडळींना मोजक्या मराठी वृत्तपत्रांचे अंक इंटरनेटवर वाचून त्यावर समाधान मानावे लागते. वेबसाईट हे माध्यम साहित्य प्रसार व उपलब्धतेसाठी वापरणे हा यावर उपाय ठरू शकतो. महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी लोकांची ही गरज भागविण्याच्या हेतूने माय मराठी या वेबसाईटद्वारे अभिजात मराठी साहित्याची ओळख करुन देण्याचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प ज्ञानदीपने हाती घेतला. पुढे साहित्याबरोबरच मराठी रीतीरिवाज, सण, परंपरा तसेच महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळे यांच्याही माहितीचा यात समावेश करण्यात आला.
www.mymarathi.com