My Pune

माय पुणे

https://mypune.net/

 

पुणे जिल्ह्याचे पर्यावरण आणि विकासाच्या समस्या हा एक मोठा विषय आहे शासकीय योजना आणि तज्ज्ञ अभियत्यांचे प्रकल्प अहवाल याची यथायोग्य माहिती सर्वसामान्य जनतेला भाषेच्या अडचणीमुळे समजत नाही यामुळे समाजाचे या कार्यात सहकार्य न मिळता विकासाच्या योजनांना समाजाकडून विरोध होतो. समाजाच्या रास्त तक्रारी व आक्षेप यांची योग्य ती दखल न घेता प्रकल्प शासकीय स्तरावर लादले जातात. प्रश्न राजकीय बनतो आणि चिरस्थायी विकास योजना पूर्ण न होता संघर्षाचे वातावरण तयार होते.

या दृष्टीकोनातून ज्ञानदीप फौंडेशनने प्रभावी लोकसहभागासाठी मराठी माध्यमातून ज्ञान प्रसार आणि माहितीची देवघेव व्हावी म्हणून महाराष्ठ्रच्या प्रत्येक जिल्ह्यात मराठी माध्यमातील वेबसाईटचे व्यासपीठ सुरू करण्याचे ठरविले असून पुणे जिल्ह्यासाठी मायपुणे डॉट नेट ही वेबसाईट कार्यान्वित केली आहे.

१२ जुलैच्या चर्चासत्रात याची माहिती देण्यात येणार असून दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स( इंडिया) आणि मराठी विज्ञान परिषद यांचे पुणे विभाग यांचे महत्वाचे योगदान यात अपेक्षित आहे. हे चर्यासत्र सर्व जनतेसाठी खुले असून या या क्षेत्रात कार्य करणा-या सर्व व्यक्ती आणि संस्था यांनी अगत्यपूर्वक उपस्थित राहून ज्ञानदीप फौंडेशनच्या या महत्वाकांक्षी योजनेत सहभागी व्हावे ही विनंती. या चर्चासत्राचे संयोजन प्रा. राजेंद्रकुमार सराफ करणार असून वेळ उपलब्धतेनुसार सहभागी व्यक्तींना
आपले विचार मांदण्याची संधी दिली जाईल.

लेखी स्वरुपात आपले विचार वा सूचना पाठविल्या तर प्रत्यक्ष सहभाग नसला तरी त्या सर्वांना वेबसाईटवर नावासह प्रसिद्धी देण्यात येईल.

पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर ……….

अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करुन सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्वज्ञान गाथेतील अभंगाच्या माध्यमातून सांगणाऱ्या संत तुकारामांची पुणे जिल्हा हीच जन्मभूमी व कर्मभूमी होती.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. शिवाजीच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहीले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे होय. म्हणूनच पुणे तेथे काय उणे अशी म्हण प्रचलित झाली आहे.

पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. बाजीराव पेशव्यांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवार वाडा ही भव्य किल्लासदृश्य वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र नाना साहेब पेशवे यांच्या काळात पुणे हे हिंदूस्थानचे सत्ताकेंद्र बनले. त्यांनी पुण्याच्या सुशोभिकरणाकडे लक्ष दिले. पर्वती देवस्थान, सारसबागेची निर्मिती केली. हौद, वाडे, मंदिरे, रस्ते इत्यादींचा विकास केला.

सन १८१८ मध्ये मराठेशाहीचा व पेशवाईचा अस्त झाला व पुढील काळात १८१८ मध्ये शनिवार वाड्यामध्ये इंग्लंडचा युनियन जॅक फडकविला गेला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुण्याच्या शनिवारवाड्यावरील युनियन जॅक काढून तेथे भारताचा तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.