Sanskritdeepika

संस्कृतदीपिका डॉट ओआरजी



संस्कृत भाषा ही सर्व भारतीय भाषांची जननी आहे. त्यामुळे कोणत्याही भारतीय भाषेचा अभ्यास करताना संस्कृतचा अभ्यास अनिवार्य ठरतो. याशिवाय संस्कृत साहित्यात सर्व विषयांवरील ज्ञानाचे अपार भांडार आहे. भारतीय संस्कृतीचा पायाही हे साहित्यच आहे. यामुळे शालेय स्तरावर संस्कृत विषयाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र संस्कृत शिकविण्यासाठी चांगले शिक्षक मिळत नाहीत. संस्कृत पुस्तकांत फक्त काही उदाहरणे दिलेली असतात. त्यांचा उपयोग करून आवश्यक ती विभक्ती वा धातुरूपे विद्यार्थ्यांना करता येत नाहीत.

संस्कृत शब्दांचा अर्थ लावणे, संधी, समास सोडविणे तसेच मराठीतून संस्कृतमध्ये भाषांतर करणे हेही त्यांना अवघड जाते. या अडचणींचा विचार करून विद्यार्थ्यांना संस्कृत शिकण्यासाठी शब्दकोश तसेच व्याकरण व भाषांतराची उदाहरणे उपलब्ध करून देण्यासाठी तीन वर्षे अथक प्रयत्न करून ही वेबसाईट बनविण्यात आली आहे. यात ६००० वर संस्कृत शब्दांचे अक्षरक्रमाप्रमाणे व विषयवार इंग्रजी व मराठीत अर्थ दिले असून संस्कृत, इंग्रजी व मराठी अशा कोणत्याही भाषेतील शब्दाचे अन्य दोन भाषांत अर्थ मिळविता येतात.

आठशे वाक्यांसाठी हीच सोय केली आहे. दोनशेवर संस्कृत सुभाषितांचे मराठी अर्थ दिल्यामुळे ही सुभाषिते कळणे व पाठ करणे मुलांना सोपे जाईल. नेहमीच्या वापरातील नामांची व सर्वनामांची विभक्तीरूपे, ४००वर धातूंची सर्व रूपे, ८०० संधी, ८०० समास, समानार्थी व विरूद्धांर्थी शब्द, अव्यये तसेच संपूर्ण व्याकरणाचा या वेबसाईटवर समावेश करण्यात आला आहे. आता संस्कृत शब्दांचे उच्चार कसे करावेत हे समजण्यासाठी ध्वनीफितीद्वारे आवाजाचीही जोड यास देण्यात येणार आहे.

www.sanskritdeepika.org