माय सांगली डॉट कॉम

Written by Administrator

माय सांगली डॉट कॉम


माय सांगली

कृष्णाकाठचा घोटीव घाट, बाजूची रम्य वनश्री. संथ वाहणारी कृष्णामाई. असंच काठाकाठानं गेलं की दिसणारा तो बागेतील गणपती. ती घनदाट चिंचेची बनं, पेरूच्या बागा आणि थोडं चालल्यावर, हरिपूरची वेस ओलांडल्यावर दिसणारा कृष्णा वारणेचा सुरेख संगम. शेजारी पवित्र आणि गंभीर वातावरण निर्माण करणारं, श्री संगमेश्वराचं ऐतिहासिक मंदिर. नुसतं त्या संगमाच्या काठावर उभं राहिलं, नदीकाठाला बिलगलेली हिरवीगार झाडं बघितली, उभ्या पिकांची सळसळ ऐकली आणि नदीवरून येणारा गार गार वारा नाकातोंडात भरून घेतला की, पैशा-अडक्याच्या व्यावहारिक जगात अडकलेलं आपलं मन नकळत काव्यमय होतं. सांगलीला असा सुंदर चेहरा मिळाला तो १८०१ साली. त्यापूर्वी गाव अस्तित्वातच नव्हतं असं नाही, परंतु ते अगदीच नगण्य होतं. पेशवाईत उदयास आलेल्या पटवर्धन सरदारांची मिरज ही जहागिरी होती. तिच्या २२ कर्यातींपैकी सांगली ही एक कर्यात होती. ( जवळ जवळ असणार्‍या तीन-चार गावात मिळून एक कर्यात म्हणत असत.) या पटवर्धन मंडळीत मालमत्तवरून कलह माजला, तेव्हा दुसर्‍या बाजीराव पेशव्यांच्या संमतीने वाटण्या झाल्या. थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन आपला हिस्सा घेऊन बाहेर पडले. कृष्णातटाकी थोडं उंचवट्यावर असलेलं सांगली गाव त्यांना आवडलं. सांगली त्यांनी आपल्या संस्थानची राजधानी बनवली आणि इथून सांगलीचं भाग्य फळफळलं!

सांगली गावाच्या नावाविषयी अनेक समजुती आहेत. काहींच्या मते कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांच्या संगमाजवळ वसलेलं गाव म्हणून गावाचं नाव र्संगमहल्ली ( हल्ली म्हणजे कानडीत गांव. कर्नाटकचा मुलुख जवळ असल्यानं) होतं. काहींच्या मते मूळ नांव संगळकी असं होतं. पुढं नद्यांच्या संगमावरील म्हणून र्संगमी नाव पडलं आणि अपभ्रंश होऊन र्सांगली ' झालं. तथापि कृष्णा नदीकाठी सहा गल्ली असलेलं गाव म्हणजे `सांगली' ही त्यातल्या त्यात सर्वमान्य असलेली समजूत.

१८०१ काली चिंतामणरावांनी सांगली संस्थान स्थापन केलं तरी सुरुवातीची त्यांची काही वर्षे, धोंडजी वाघाबरोबरची आणि करवीरकरांविरुद्ध चाललेल्या युद्धातच गेली. नंतर मात्र लागलीच त्यांनी सांगली गावाच्या संरक्षणासाठी सुप्रसिद्ध `गणेशदुर्ग' बांधला. चारी बाजूंनी खंदक असलेला हा भुईकोट किल्ला म्हरजे सांगलीचे एक वैशिष्ट्य होतं ! ( याच गणेशदुर्गाच्या तुरुंगातून खंदकात उड्या टाकून स्वातंत्र्यसंग्रामात वसंतदादा पाटील यांनी ऐतिहासिक पलायन केलं होतं.) संरक्षणासाठी गणेशदुर्ग बांधल्यावर पूजेसाठी देऊळ हवंच. पटवर्धन मंडळी परम गणेशभक्त. म्हणून १८११ साली चिंतामणरावांनी सांगलीचं भूषण ठरणारं गणपती मंदिर बांधायला घेतलं. त्याचं काम तब्बल तीस वर्ष चालू होतं.

सांगली गावाची भरभराट व्हावी म्हणून त्यांनी शास्त्री, पंडित, गवई, पैलवान, जनावरांची पारख कररारे, कारागीर अशी अनेक प्रकारची माणसं सांगलीत बोलावून त्यांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या. त्यामुळेच सांगलीला मराठी नाटकांचे जन्मदाते विष्णुदास भावे गवसले. आबासाहेब गरवारे यांच्यासारखे धन्वंतरी लाभले आणि `कुमारी', मोताच्या घाटाची भांडी बनविणारे कुशल कारागीर मिळाले. तांब्या पितळेची भांडी बनविणार्‍या आणि सोन्या चांदीवर नाजूक कलाकुसर बनविणार्‍या सराफांच्या अनेक पिढ्या त्यामुळे सांगलीत निर्माण झाल्या. सुशिक्षितांचं गाव म्हणून पुण्याच्या खालोखाल नाव घेतल्या जाणार्‍या सांगलीत १८६१ मध्ये सार्वजनिक शिक्षणाची सुरुवात झाली. पण अत्याधुनिक सांगलीचा खरा पाया घातला गेला तो १९०३ साली सांगली संस्थानच्या गादीवर आलेल्या प्रागतिक आणि उदारमतवादी दुसर्‍या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या कारकिर्दीत.

१९०५ ते १९१० या पाच वर्षात दुसरे श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांच्या काळात संस्थानचे प्रशासक कॅप्टन बर्क यांच्या कल्पकतेतून. जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालयाची इमारत, तसेच नगरपालिका आणि सांगली हायस्कूलची सध्याची इमारत अशा इमारतींची बांधकामे झाली आणि सांगलीच्या वैभवात ऐतिहासिक भर पडली.

Visit Us : www.mysangli.com