इंटरनेटद्वारे फसवणूक
लोकांच्या भाबडेपणाचा व अज्ञानाचा फायदा घेऊन फसविले जाण्याच्या अनेक गोष्टी आपण ऎकतो. यात बुवाबाजी, औषधे व इतर वस्तू यांच्या विक्रीसाठी करण्यात येणार्या खोट्या जाहिराती, कमी श्रमात वा गुंतवणुकीत भरपूर नफा मिळविण्याचे आमिष दाखविणार्या नोकर्या, साखळी योजना यांचा समावेश होतो. यामध्ये चांगल्या अनुभवाचे खोटे दाखले देऊन लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू असतात. वर्तमानपत्रातील बोगस लॉटर्या, कोडी व टी. व्ही. वरील अतिशयोक्ती करणार्या अशा जाहिरातींना माणूस बळी पडतो.
इंटरनेटच्या प्रगतीमुळे माहिती मिळविण्याचा व संपर्क साधण्याचे नवे प्रभावी व अत्यंत स्वस्त साधन उपलब्ध झाले. साहजिकच याचा वापर प्रचंड वेगाने वाढू लागला. बॅंकेचे व्यवहार व पैसे पाठविण्याचे कामही इंटरनेटने होऊ लागल्याने व क्रेडीट कार्ड सहज मिळू लागल्याने सर्व व्यवहारांशाठी इंटरनेट एक महत्वाचे साधन बनले. कोठेही गर्दी झाली की त्यात जसे चोर व गुन्हेगार ही असतात त्याप्रमाणे इंटरनेट क्षेत्रातही अशी वाटमारी सुरू झाली. नाना क्लृप्त्या काढून या क्षेत्रात नवखे असणार्या लोकांना फसविण्याचे अनेक प्रकार घडू लागले. स्पॅम ओळखणार्या अशा जाहिराती वेगळ्या करून त्या नष्ट करण्याच्या संगणक प्रणाल्या विकसित झाल्या. तरी यातून सुटून नवनवे मार्ग वापरून इ मेलद्वारे फसविण्याचे प्रकार घडतच आहेत.
यावर एक उपाय म्हणजे अशा सर्व फसवणुकीच्या घटनांबद्दल सखोल माहिती जमा करून ती लोकांपर्यंत पोचविणे यामुळे लोक सावध होतील व खोट्या आश्वासनाना बळी पडणार नाहीत.
स्पॅम मेल कशी ओळखावी
१. अत्यंत महागडी वस्तू अगदी अत्यल्प किमतीत देण्याचे आश्वासन दॆणारी मेल
२. इंटरनेटवर वस्तू खरेदी करतानाच्या लिलाव प्रक्रियेत तुम्ही जिंकलात व विक्रेत्याने केवळ मनी ट्रॅन्स्फर पद्धतीनेच पैसे स्वीकारण्याचा आग्रह धरला तर फसवणूक होण्याची शक्यता असते.
३. तुम्हाला लॉटरी लागली आहे वा बक्षिस मिळाले आहे असे कळवून त्या रकमेवरील कर व कायदेशीर करारनाम्यासाठी पैशाची मागणी केली असेल तर तो फसवणुकीचा प्रकार असतो.
४. तुमच्या गहाळ वस्तूच्या शोधासाठी केलेल्या जाहिरातीस येणार्या प्रतिसादात हरवलेली वस्तू शोधल्याचे कळवून बक्षिस म्हणून किंवा वस्तू पाठविण्यासाठी येणार्या पोस्टेजसाठी पैसे पाठविण्याची मागणी करणारी मेल
५. तुम्ही विकत असलेल्य वस्तूसाठी किमतीपेक्षा बर्याच जास्त किमतीचा चेक तुम्हाला आला व किमतीपेक्षा जास्त असणारी रक्कम तुम्ही परत पाठवावी अशी मागणी आली तर.
६. तुम्हाला अत्यंत अल्प दरात कर्ज मंजूर झाले व कर्ज मंजुरीचा खर्च व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मनी ट्रॅन्स्फर पद्धतीने पैसे पाठविण्यास कळविले गेले तर.
७. पोलिस ऑफिसर असल्याचे भासवून कोणी तुमच्या नातेवाईकाच्या वा मित्राच्या सुटकेसाठी कोणी पैसे पाठविण्याची मेल केली तर
८. आपला नातेवाईक हार्ट अटॅकमुळे किंवा अपघातात सापडल्याने दवाखान्यात भरती झाला आहे व उपचारासाठी नेटवरून पैसे पाठविण्याबाबत दवाखान्यातील अधिकारी, डॉक्टर वा अन्य माहितीच्या व्यक्तीच्या नावे मेल आली तर
९. तुम्हाला भरपूर पगाराची नोकरी देऊ करून प्रशिक्षणासाठी वा हमीपत्रासाठी पैशाचे मागणी केली असेल तर ती स्पॅम मेल असू शकते.
माझ्या माहितीतल्या विद्यार्थ्यांना व आमच्या कंपनीतील काही कर्मचार्याना अशा फसवणुकीचा अनुभव आला आर्थिक फटकाही बसला.
काही वर्षांपूर्वी आमच्या कॉलेजमध्ये नोकरीसाठी इंटरव्ह्यू घेण्यासाठी बंगलोरहून एक व्यक्ती आली. प्राचार्यांसमवेत त्याने सर्व इच्छुकांच्या परिक्षा व मुलाखती घेतल्या व निवड झालेल्यांना त्यांना सिंगापूरला एक महिना प्रशिक्षण व अमेरिकेत ५००० डॉलर प्रति महिन्याची नोकरी देण्याचे जाहीर केले. असे किती विद्यार्थी निवडले गेले हे विचारल्यावर आमच्या कॉलेजमधील बारा व बिहारमधील दोन विद्यार्थी निवडले गेले असल्याचे मला समजले. निवड झालेल्यातील एक विद्यार्थी त्यावेळी माझ्या घरात रहात होता. मला हे कळेना की बंगलोरच्या कंपनीला फक्त आमच्याच कॉलेजमधील एवढॆ विद्यार्थी कसे योग्य वाटले. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मनी टॅन्स्फरने प्रत्येकी २००० डॉलर भरून चेन्नईला येण्यास सांगितले होते. याबाबतीत गोपनीयता बाळगण्यासही बजावले होते. मी याबाबतीत मेलवरून अधिक माहिती काढण्यास व यापूर्वीच्या अशा निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचा अनुभव इंटरनेटवरून विचारण्याबद्दल त्याला सांगितले.
तेव्हा या प्रकारात काही जण फसल्याचे समजले. कंपनीकडे विचारणा केल्यावर असे कळले की ती कंपनी अस्तित्वात असली तरी आलेला माणूस व त्याचा पैसे पाठविण्यासाथी दिलेला मेल अड्रेस बोगस होता. ही माहिती कळल्याने पुढील फसगत टळली.
माझ्या माहितीचे एक प्रोफेसर मला एकदा म्हणाले की त्यांना लंडनची ५०००० पौंडाची लॉटरी लागली आहे व सर्व माहिती टॅक्स व लिगल चार्जेससाठी २००० पौंड आधी पाठविले की ते पैसे मिळणार आहेत. मी त्यांना हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे सांगितले. त्यांचे नुकसान झाल्याचे त्याना वाटू नये म्हणून मी त्याना माझ्याकडे पैसे नाहीत लॉटरीतील पैशातून सर्व खर्च वजा करून उरलेले पैसे पाठविण्याबद्दल कळविण्यास सांगितले. तेव्हा आपोआपच संपर्क तुटला व खोटेपणा त्यांच्या लक्षात आला.
एके दिवशी आमच्या कंपनीत नव्यानेच लागलेल्या व दुसरी चांगली नोकरी शोधण्याच्या प्रयत्नात असणार्या कर्मचार्याने ऑफिसात आल्यावर स्कॅनरवर आपला पासपोर्ट, बॅंकबुक स्कॅन केले व मेल करून झाल्यावर मला सांगायला आला. तो म्हणाला ‘ सर, तुम्हाला सांगायला हरकत नाही, पण मला चांगल्या नोकरीची ऑफर आली आहे व त्यांनी विचारल्याप्रमाणे आताच त्याना माझी सर्व माहिती पाठविली आहे. आता ते मला ऑर्डर पाठवतील.’ मी हा स्पॅम मेलचा प्रकार असण्याची शक्यता वर्तवली. नंतर त्याने कंपनीशी संपर्क साधल्यावर त्याला स्पॅमचा पत्ता लागला. सर्व माहिती पाठविली असल्याने तो फार घाबरला. मी त्याला बॅंकेत कोणताही चेक त्याच्या संमती खेरीज पास करु नये अशी सूचना देण्यास सांगितले.
नुकताच आमच्या ऑफिसमधील एका हुषार संगणकतज्ज्ञाला मलेशियात मोठ्या पगारावर नोकरीची ऑफर आली. मात्र तेथे गेल्यावर सांगितलेल्या कामापेक्षा बरेच मोठे काम त्यांच्या कडक नियंत्रणाखाली करावे लागणार असल्याचे त्याच्या लक्षात आले. पासपोर्ट जमा करण्याबद्दलही कंपनीने सूचना केली ते पाहता तेथील दुसर्या परिचिताच्या मदतीने तो कसाबसा तेथून परत आला.
एकंदरित पाह्ता जग हे आपल्या कल्पनेपेक्षा फार धूर्त व व्यवहारी आहे. जगात कोणतीही गोष्ट फुकट व स्वस्त मिळत नाही. हे लक्षात ठेवावे. वस्तू खरेदी करताना पूर्वीच्या ग्राहकांचा अनुभव स्वतंत्रपणे शोधावा. जाहिरात करणार्या व नोकरी दॆणार्या व्यक्ती वा संस्थेची माहिती बाहेरून मिळवावी व ठावठिकाणा त्या भागातील आपल्या परिचिताकडून तपासून घ्यावा. त्या कंपनीत काम करणार्या अन्य कोणास मेल करून खात्री करून घ्यावी खोटे इंटरव्ह्यू घेऊन वा नेटवर परिक्षा घेऊन कोणी जास्त पगाराची नोकरी देऊ केली असेल तर आपल्या शैक्षणिक योग्यतेला व अनुभवाला बाहेरच्या परिस्थितीत किती किंमत आहे या गोष्टीशी तुलना करावी. आपल्या शैक्षणिक योग्यतेपेक्षा कोणीही व कधीही जास्त दर्जाची व पगाराची नोकरी देत नाही हॆ नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.
अशा फसवणुकीच्या प्रकारांची इत्थंभूत माहिती सर्व लोकांपर्यंत जाणे आवश्यक आहे असे मला वाटले.