कृष्णा नदी प्रदूषणः कारणे
कृष्णा नदीः
कृष्णा नदीला दक्षिण भारताची गंगा म्हटले जाते. महाराष्ट्रातील ती एक महत्वाची नदी असून सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात कृष्णा व तिच्या उपनद्यांचे खोरे आहे. कृष्णा नदी महाबळेश्वर येथे उगम पावून डोंगराळ भागातून मार्गक्रमण करीत ५० कि.मी नंतर वाईला येऊन पोचते तेथून पुढचा महाराष्ट्रातील सुमारे २७० कि. मी. चा प्रवास सपाट प्रदेशातून नागमोडी मार्गाने पार करीत ती नृसिहवाडी नंतर कर्नाटक राज्यांत शिरते. नदीच्या उगमापासून कराडपर्यत नदीचा प्रवाह कमी असून कराडला कोयना मिळाल्यावर कोयना धरणातील पाण्यामुळे नदीच्या प्रवाहात वाढ होते. कराड पासून सांगली पर्यतचा भाग बागायती शेती असून औद्योगिक दृष्टयाही अतिशय प्रगत आहे. कराड, इस्लामपूर, सांगली अशी मोठी शहरे व अनेक छोटी गावे या नदीच्या दोन्ही काठांना वसली आहेत. त्यामुळे या भागातील प्रदूषणाचा विचार या लेखात केला आहे.
बिगर मोसमी काळात कृष्णा नदीचा प्रवाह कृष्णेवरील वाई येथे असणारे धोम धरण व कोयनेवरील कोयना धरण यातून सोडल्या जाणार्या पाण्यावर अवलंबून असतो. पाणी साठविण्यासाठी नदीवर खोडशी, बहे, बोरगांव, नागठाणे, डिग्रज, सांगली येथे बांधारे बांधले आहेत. एका बंधार्याचे पाणी दुसर्या बंधार्यास टेकेल अशा रितीने बंधार्यांच्या जागा ठरविण्यात आल्या आहेत. पावसाळ्याचा काळ सोडला तर नदी ही नदी न राहता बंधार्यांमागे साठलेल्या तलावांची साखळी या स्वरुपात कार्य करते. त्यामुळे प्रवाह नसल्याने हवेतील ऑक्सिजन योग्य प्रमानात पाण्यात मिसळू शकत नाही व नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रियेस फार मोठी मर्यादा पडते.
१) शेतीसाठी पाण्याचा वापरः
नदीच्या एकूण पाण्याच्या वापरापैकी ८० ते ९० टक्के पाणी मुख्यत्वे शेतीसाठी वापरले जाते असे आढळून आले आहे. शेतीसाठी कृष्णा नदीवर अनेक उपसा जलसिंचन योजना असून कृष्णा कालव्याचाही उपयोग होतो. औद्योगिक वापरासाठी व शहरांसाठी लागणारे पाणीही या बंधार्यात साठणार्या पाण्यातून उचलण्यासाठी अनेक उपसा योजना कार्यान्वित आहेत. या सर्व कारणासाठी वापरलेल्या पाण्यातील काही भाग दूषित पदार्थ व क्षार यांच्यासह नदीच्या पाण्यात ठिकठिकाणाच्या नाल्यांद्वारे मिसळतो व प्रदूषणास कारणीभूत ठरतो.पाण्याची उपलब्धता भरपूर असली तरी ती अनिश्चित असल्याने शेतकरी मिळेल तेंव्हा शेतीला भरपूर पाणी पाजतो. यामुळे शेतीला फायदा न होता उलट नुकसानच होते. शिवाय जादा झालेले पाणी जमीन खराब करते. वा परत वाहत येऊन नदीस मिळते. अशावेळी या पाण्याबरोबर खते, कीटकनाशके, सांडपाणी व क्षारही पाण्यात मिसळतात. डिग्रज भागातील हजारो एकर जमीन पाण्याच्या जादा वापराने क्षारपड व नापीक झाली आहे. हे प्रत्यक्ष उदाहरण शेतकर्यांपुढे असूनही पाण्याचा शास्त्रीय व काटकसरीने वापर करण्याबाबत अजून, फारशी प्रगती झालेली नाही
२) औद्योगिक प्रदुषण
अ) साखर कारखाने : उसापासून साखर तयार करताना बाहेर पडणार्याम सांडपाण्यात तेले, चिपडाचे कण व १००० ते १५०० मि. ग्रॅ/लि. पर्यत बी. ओ. डी (सेंद्रीय पदार्थ) हे दूषित पदार्थ असतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटींप्रमाणे या भागातील सर्व साखर कारखान्यांनी सांडपाणी शुध्दीकरण यंत्रणा बसविल्या आहेत. प्रक्रिया केलेले सांडपाणी, चांगल्या पाण्याने सौंम्य करून शेतीसाठी वापरले जाते. यावेळी सांडपाण्याचा बी. ओ. डी. १०० मि. ग्रॅ/लि पेक्षा कमी असावा लागतो. सांडपाणी शुध्दीकरण यंत्रणा योग्यरितीने कार्य करीत नसेल तर जमीन व पाण्याचे प्रदूषण होऊ शकते. नादुरुस्त यंत्रणा, विद्युत पुरवठयात खंड वा पुरेसे प्रशिक्षण नसलेला चालकवर्ग असल्यास असे प्रदूषण होते. शेतीस वापरलेले अतिरिक्त पाणी नदीस प्रदूषित करू शकते.
ब) आसवनी-साखर कारखान्यातून बाहेर पडणार्या मळीपासून अल्कोहोल तयार करणार्या. आसवनीमधून स्पॅटवॉश नावाचे अतिशय दाहक, लालभडक, आणि अतिशय जास्त आम्लयुक्त, सेंद्रीय पदार्थ व क्षार असणारे सांडपाणी बाहेर पडते. याचा बी. ओ. डी.४०००० ते ५०,००० मि. ग्रॅ / लि. इतका जास्त असतो त्यामुळे प्रदूषणाचा सर्वात जास्त धोका संभवतो. पारंपारिक पध्दती ह्या स्पेटंवॉशवर मोठया खड्ड्यामध्ये जीवाणू प्रक्रिया केली जात असे. परंतू आता शुध्दीकरणाच्या नव्या पध्दतींचा वापर करने आवश्यक ठरत आहे. साखर कारखान्यातून बाहेर पडणार्या ’प्रेसमड’ या टाकाऊ घन पदार्थाच्या मिश्रणातून कंपोस्ट करून चांगले खत बनविणे हा प्रकल्प आता बहुतेक साखर कारखान्यांनी हाती घेतला आहे.
क) अॅसेटोन व अॅसेटिक आम्ल प्रकल्प यांचे सांडपाणी आम्लयुक्त असल्याने त्याचे चुन्याने उदासिनीकरण करून साखर कारखान्याच्या सांडपाण्याबरोबर त्यावर प्रक्रिया केली जाते.
३) शहरांचे सांडपाणीः शहरांच्या सांडपाण्याच्या प्रश्नाकडे अजून म्हणावे तितके लक्ष दिले जात नाही असे खेदपूर्वक म्हणावेसे वाटते. कराड, इस्लामपूर, सांगली येथील सांडपाणी एकत्रीकरण, उपसा व शुध्दीकरण यात अनेक त्रुटी असून सांडपाण्याचा बराच भाग प्रक्रिया न होता नदीत मिसळण्याची परिस्थिती कायम आहे. अशा सांडपाण्यामध्ये रोगजंतूंचा समावेश असण्याची व त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते. सांडपाणी शुध्दीकरणासाठी आधुनिक व यांत्रिक पध्दतीचा वापर करावा असे येथे सुचवावयाचे नाही. आधुनिक ख्रर्चिक पध्दतीमुळे चांगले शुध्दीकरण होत असले तरी वीजखर्चामुळे अशी यंत्रणा नियमित चालविणे स्थानिक संस्थांच्या आवाक्याबाहेरचे काम आहे. परिणामी यंत्रणा बंद पडण्याचा धोका अधिक असतो. त्यापेक्षा कमी खर्चाच्या ऑक्सिकरण तलावासारख्या योजनाही चांगले कार्य करू शकतात. मात्र यासाठी जागा नदीपासून व शहरापासून खूप दूर प्रक्रिया केलेले सांडपाणी केवळ शेतीसच वापरले जाईल याची व्यवस्था करावयास हवी.
प्रदूषणाची सद्यस्थितीः
कृष्णा नदीच्या कराड पासून सांगली पर्यंतच्या प्रदूषणाबाबत १९८६ पासून सातत्याने सर्वेक्षण झाले असून त्यांच्या निष्कर्षानुसार पाण्यात सर्वसाधारणपणे बी. ओ. डी. चे प्रमाण २ ते २.६ मि. ग्रॅ/लि इतका कमी असला तरी जीवाणूंचे प्रमाण (एम.पी.एन) जास्त आढळते. रेठरे नाला व शेरीनाला या दोन प्रमुख नाल्यातील पाणी दूषित असून नदीला जेथे हे पाणी मिळते तेथे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण फार कमी आढळते. क्षारांचे प्रमाण कराडपासून वाळव्यापर्यत सामान्य (कठीणपणा १००-१५०मि. ग्रॅ.लि) असले तरी सांगलीत त्यामध्ये फार वाढ (कठीणपणा ३२५ ते ६०० मि.ग्रॅ/लि) होते. वाळवा ते सांगली दरम्यान बागायती शेतीचे प्रमाण व पाण्याचा वापर जास्त असल्याने तसेच नदीकाठच्या डिग्रजजवळील जमिनी क्षारयुक्त झाल्याने नदीच्या पाण्यात क्षार उतरत असावेत असे वाटते.
कराड पासून सांगली पर्यतचा भाग औद्योगिक दृष्टया विकसित झाला असला तरी तो प्रदुषणाच्या दृष्टीने अधिक नाजूका बनला आहे. प्रत्येक भागाची प्रदूषण सहन करण्याची काही विशिष्ट क्षमता असते. त्यापेक्षा प्रदुषणाची पातळी वाढली की ती विकासात मारक ठरते. त्यामुळे या भागात नवे उद्योगधंदे आणताना फार काळजी पुर्वक विचार करावयास हवा. प्रदुषण नियंत्रणासाठी अशा नव्या उद्योगावर अधिक कडक बंधने घालावयास हवीत.
वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उद्योगधंद्यांची वाढ आणि शेतीविकास यामुळे पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील बहुतेक नद्या केवळ पावसाळ्यात वाहणार्याह असल्याने बिगर मोसमी काळात पाण्याची गरज भागविण्यासाठी धरणातून सोडलेल्या. पाण्यावर किंवा बंधार्यामागे साठलेल्या पाण्यावर सर्वस्वी अवलंबून रहावे लागते. नदी म्हणजे जणू तलावांची साखळीच असते. नदीच्या पाण्याचे प्रदूषण व त्याचे स्वंयशुध्दीकरण याबाबतीत केले जाणारे वैज्ञानिक आडाखे अशा साठविलेल्या पाण्याच्या बाबतीत लागू पडत नाहीत. बहुतेक वेळा हे पाणी स्थिर असल्याने शुध्दीकरणाचा वेग अतिशय कमी असतो. पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे व जलप्रदूषणामुळे नव्या समस्या निर्माण होत आहेत. जलप्रदूषणाच्या कारणांचा शोध घेऊन योग्य ते उपाय केले नाहीत तर नजिकच्या भविष्यकाळात पिण्याच्यां पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईलच पण दूषित पाण्यचा जमीन व इतर पर्यावरण घटकांचाही फार हानीकारक प्रभाव पडेल अशी शक्यता आहे.