कै. सौ. शुभांगी रानडे - रेडिओ मुलाखत २० जुलै २०१२

संस्कृतदीपिका या वेबसाईटच्या निर्मात्या आणि तीन काव्यसंग्रह प्रसिद्ध करणा-या सांगलीतील ज्ञानदीप इन्फोटेकच्या  माजी संचालिका सौ. शुभांगी रानडे यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी दिनांक २२ ऑगस्ट २०१६ रोजी दुखद निधन झाले.

 

 

ग्रीन एफ एम ९०.४ या सांगलीतील कम्युनिटी रेडिओ चॅनेलवर दिनांक २० जुलै २०१२ रोजी सौ. शुभांगी रानडे यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती. त्यांच्या कार्याची ओळख   व्हावी या हेतूने या मुलाखतीचा वृत्तांत आहे त्याच बोली भाषेत सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. ( आपल्या सूचना व अभिप्रायांचे स्वागत आहे.)

मुलाखतकार सौ. मेधा सोवनी -

आज आपल्याकडे शुभांगी रानडे या आलेल्या आहेत. निवृत्त शिक्षिका आहेत त्या आणि

त्यांच्याकडून आपल्याला ब-याच नवीन नवीन  गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. त्या संस्कृतच्या टीचर होत्या एम. ए. बी. एड झालेल्या आहेत त्या आणि आजही सतत त्या कामात व्यस्त असतात. निरनिराळं लिखाण त्यांच सतत चाललेलं असतं आणि ते सगळं कशा पद्धतीनं चाललेलं असतं ते मी नाही तुम्हाला सांगत तर त्यासाठी आपण त्यांनाच विचारुया. कारण त्यांच्या कामाचा जो ढंग आहे तो खूप वेगळा आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसं विचार पण करू शकणार नाहीत, असं काहीतरी गंमतशीर, त्यांचं चाललेलं असतं. हे त्यांना आपल्याला सांगायचंय. त्यासाठी आपण त्यांना इथं बोलावलंय, तर

‘नमस्कार शुभांगीताई, संस्कृत भाषा घेऊन तुम्ही एमए झालात. बीएड आहात तुम्ही. शिक्षिका म्हणून तुम्ही काम केलेलं आहे आणि एक उत्तम कवयित्रीपण आहात तुम्ही. तर आज तो उहापोह आपण या कार्यक्रमात करुया.

तर सुरवातीला थोडंसं तुमचं पूर्वाश्रमीचं जे आयुष्य होतं, ते आम्हाला आता सांगा आणि नंतर तुमच्या कविता व इतर सारे उद्योग आहेत, त्याविषयी बोलूया.

सौ. शुभांगी रानडे - माझं माहेर पुण्याचं ते म्हणजे प्युअर सदासिव पेठी समजा तर. त्याच्यामुळे सहज बोलण्या चालण्यात सुध्दा लोकं म्हणायची, तुम्ही पुण्याच्या काहो कसं काय ओळखलं मी काही लिहिलं नाही कपाळावर, नाही तुमच्या बोलण्यावरून दिसतं म्हणजे यातनं मला फार गंमत वाटली की हे लोकांना कसं कळतं.

सौ. मेधा सोवनी - ही एक भाषेची  छाप आहे. ते आपोआपच कळते.

सौ. शुभांगी रानडे - तर मी जाणून-बिणून काही असे शब्द बोलत नाही. पण ती एक सवयच पडून गेली असायची. संस्कृतची आवड होती पहिल्यापासूनची. शिकता शिकता असं वाटलं की आपण इतर विषय घेण्याऐवजी संस्कृत विषय घेतला तर आवडेल आपल्याला. बी.ए. होस्तवर धरातली परिस्थितीही थोडी अवघड होती. आई नोकरी करत होती. ताराचंद हॉस्पिटलमध्ये नर्स होती आई. त्यामुळं घर सांभाळून, मी सगळ्यात धाकटी, बाकीच्यांची लग्नं झालेली. मोठा भाऊ शिकत होता, मेडिकलला होता. दोन भावांची मुलं आमच्याकडं होती. त्यांना, सगळ्या भाच्यांना सांभाळून मग जमेल तेवढं शिक्षण. त्यामुळे आई म्हणाली, `बाई सकाळचं कॉलेज करणार असशील तर ठीक. तुला काही सायन्सला घालणं मला काही जमणार नाही.` असं करत करत, संस्कृत बीए झाल्यावर असं वाटलं, मला एमए करणं झेपेल का पण पुन्हा वाटलं कशाला काळजी करतीस म्हणतात ना `गाजराची पुंगी. वाजली तर वाजली नाही तर मोडून टाकू` ट्राय तर करू. नशिबानं मिळाला प्रवेश. मग दोन वर्ष कशी गेली कळली नाहीत. एमए झाले. लगेच बीएड पुढच्या वर्षी. म्हणजे शिक्षणाचा ओघ हा सतत झाला.

बीएड होता होता लग्नाची वेळ आली आणि पुणे सोडून सांगलीला यायची वेळ आली आणि येईस्तो लगेच नोकरी तयार होती सिटी हायस्कूलला सर्व्हीसची. ते म्हणाले  करणार का माधवनगरला जाणार का मी म्हटलं सासरी विचारलं पाहिजे, मी पहिल्यांदा सांगलीला आलीय.  मला. काहीच माहिती नाही माधवनगरची. पण झालं एकंदरीत नशिबानं व्यवस्थित आणि मिळालं हवंतसं. मुलगी झाली मला. मग मिस्टरांसाठी पीएचडीला गेलो कानपूरला.  ते पीएचडीला. त्यावेळी मी माझी नोकरी सोडली. मी विचार केला की आपण  नोकरी करीत बसायचं आणि त्यांच्यासाठी काय करणार. नोकरी काय परत मिळेल. हे दिवस नाही परत येणार. मग तीन वर्षांसाठी नोकरी सोडून गेले होते मी तिकडे, परत आल्यावर लहान मुलगा झाला नंतर, आता मुलं निवांत आहेत. दोघेही अमेरिकेत आहेत. लग्नकार्ये करून. मग आम्ही रिकामेच दोघेजण. आता काय करणार

आणि मग माझ्या लक्षात आलं की  आई  शिकली नाही तरी ती जाताना तिचा वरदहस्त ठेऊन गेली बहुतेक. आणि ती गेल्यावर इतक्या मला पटापटा कविता सुचायला लागल्या की दिवसाला एक कविता पडायला लागली. मी कधीच केल्या नव्हत्या आधी. पण हे मला कसं सुचायला लागलं हे लक्षात नाही आलं. पण मधला काळ सगळा संसाराचा गेला. मुलंबाळं, त्यांची लग्नं कार्य. नंतर मात्र कविता इतक्या वेगात झाल्या की `काव्यदीप` नावाचं पुस्तक मी काढलं. त्यात १०० कविता होत्या. दुसरं पुस्तक काढलं `सांगावा` म्हणून त्यात साधारणपणे ६०-६५ झाल्या. आता तिस-या पुस्तकाची योजना आहे `सय` म्हणून. त्यात माझ्या ३५-४० कविता झाल्या आहेत. पुन्हा वाटतं करून टाकावं रिकामं.

सौ. मेधा सोवनी - शुभांगीताई, आत्ता तुम्ही दोन तीन पुस्तकांची नावं सांगितलीत. मी आता त्याच्याकडेच येणार होते की ही जी पुस्तकं आहेत. तुम्ही साधारण २००० नंतर ही पुस्तके काढलीत. तेव्हा मला असं वाटलं की तुम्ही खूप पूर्वीपासून कविता लिहिताय का आमि मी विचारणार होते की तुमचे पहिलं काव्य कधी जन्माला आलं वगैरे. तर तुम्ही काही वेगळंच सांगितलत की आई गेल्यानंतरचं.

सौ. शुभांगी रानडे - आई एकोणनव्वदला गेली आई गेल्यावरच मी पहिली कविता तिच्यासाठीची म्हणून केली.

सौ. मेधा सोवनी - कुठली कविता संगाल का.

सौ. शुभांगी रानडे - हो हो आहे की काहीच प्रश्न नाही.  तिच्यावरची कविता म्हणजे मला असं काही वाटलं नाही की आपल्याला कविता करता येतात का की आजपर्यंत आपम केस्या पम मला राहवेच ना की आपल्या हातनं हे जालंच पाहिजे आमि ते सुद्दा कधी तर वर्ष झाल्यावर. वर्षश्राद्धाच्या वेळी मी करून नेली आणि मग मला इतकं भरुन आलं की वा आपल्याला येताय मग रोजच यायला लागल्या. एखादं काव्य म्हणून दाखविते

   

     वर्ष कसे हे सरून गेले
    कळले मजला नाही
    परि माऊली माया अमुचि
    तिळभर आटली नाही ---- १

    कितीक झाले त्यागी विरागी
    गणती त्यांची नाही
    परि मला वाटते त्यागाला तव
    जगती उपमा नाही ---- २

वर्षश्राद्धाच्या वेळी अशाच पद्धतीची ५-७ कडवी लिहिली आहेत. त्यातले शेवटचे छोटंसं कडवे मला फील होणारे, म्हणून वाचून दाखविते.

    कृष्णतुलेसम उणीव तुझी ही
    सदैव भासत राही
    तुला वाहतो स्मृतिसुमने ही
    विनम्रभावे आम्ही ---- ७

आणि आता लक्षात येतं की आईच्यावर कितीही बोललं किंवा लिहिलं तरी कमीच पडते ते.

सौ. मेधा सोवनी -  अगदी

सौ. शुभांगी रानडे - हा विषयच तसा आहे.

सौ. मेधा सोवनी - खूप गहन आहे तो.

सौ. शुभांगी रानडे -असं होऊ शकत नाही की आईची ऊब तुझ्याबाबतीत वेगळी आणि माझ्याबाबतीत वेगळी. शेवटी आई ती आई, जरी परदेशी असो वगैरे, गोरगरीब असो श्रीमंत असो आई ती आईच. कष्ट घेण्याची

सौ. मेधा सोवनी - बरोबर आहे. म्हणजे, मला एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की इतकी तीव्र भावना आतून निर्माण झाल्यावर तुम्हाला हे शब्द सुचले पहिल्यांदा व नंतर तुम्ही हे काव्य लिहिलंत आणि ते आईला अर्पण केलंत तर असं कधी होतं का की काव्य आधी सुचले आणि मग त्याला चाल लावलीत तुम्ही की आधी चाल सुचते व मग शब्द येतात.

सौ. शुभांगी रानडे - तीच गंमत आहे की मला आधी चाल सुचते मग त्यात काव्य बसते. मग त्यात शब्द बसतात. आधी सुचतच नाही मला काई. मनात असतं कविता करायचीय. आणि एकदा का चाल सुचली की टेबलावर पाटीपेन्सिल ठेवलेली असते. मग त्यात दोन शब्द, दोन शब्द, दोन शब्द लिहीत जाऊन मग ते कम्प्लीट होतं. फायनली मग शेवटचा पीस लिहिला जातो पण ते आधी चाल बसल्याशिवाय येतच नाही मला ते तिहायला. 

मग या पद्धतीच्या माझ्या देवाच्या कविता झाल्यात, आप्तेष्टांच्यावरच्या कविता झाल्यात, निसर्गाबद्दलच्या कविता झाल्यात, कवितेबद्दलच्या कविता आहेत. परवा सहज सांगायची गंमत म्हणजे एकदा अचानक फोन आला. किती आठ दहा दिवसांपूर्वी. मला तुमच्या कविता फार आवडल्या हो.  मी म्हटलं थॅंक्यू. नाही तुम्ही चाली फार सुंदर म्हणल्यात. तुम्हाला कसं कळलं गुगलवर सर्च केलं तेव्हा तुमच्या कविता मिळाल्या. गंमत अशी की माझ्या पुस्तकातल्या सगळ्या कविता गेय आहेच आणि गुगलवर टाकलेल्या आहेत. आवाजासह.

सौ. मेधा सोवनी - छानच आहे. म्हणजे मगाशी मी म्हटलं ना की यांचे वेगवेगळे उद्योग कशाप्रकारे चालू आहेत.हे नॉर्मल माणसाच्या डोक्यात पण येत नाही. आता एखाद्या कवयित्रिला वा कवीला काय वाटेल की आपण कविता लिहावी. त्याचं. पुस्तक प्रकाशित करावं. पण असं किती जणांनी केलंय की आपल्याच कविता या गायच्या आणि ते गायलेलं सगळं गुगलवर टाकायचं. सांगा बरं असं किती जणांनी केलंय. मग ह्यात त्यांनी जे केलंय ऐकूया त्यांच्याकडे मग.
सौ. शुभांगी रानडे -
म्हणजे जगभरात ते कुणालाही ऐकायला मिळते ते.  रेकार्डिंग माझं मी केलं हं घरी. आमच्याकडे सौंडप्रुफ वगैरे काही नाही. बोलल्यासरखे. मी स्वत माईक घेऊन बसते. रेकॉर्डिंग करते. मध्येच एखादवेळी बेल वाजते. एखाद काही होतं. मधे कट होतं पण मी अशा पद्धतीनं सगळं रेकॉर्डिंग केलेले आहे. सगळ्या कविता रेकॉर्ड केल्या आहेत. अर्थात या सर्वात मदत मला माझ्या मिस्टरांची  झाली यात वादच नाही. म्हणजे खारीसारखं काम माझं, कविता लिहिण्याचं आणि म्हणण्याचं, बाकी मेन्ली काम त्यांचं.

    ⁃    पलिकडचा आवाज आला `मला तुमची मुरली कविता इतकी आवडली की आमच्याकडं आता लक्षार्चन आहे त्यावेळी मी तुमची कविता चालीवर म्हणणार आहे. मी म्हटलं `थॅंक्यू थॅंक्यू , पण आता आपण कोण बोलताय ते सांगाल का प्लीज. ती म्हणली मी `मीनल गद्रे बोलतीय.`

    ⁃    ` हो का पण मी नाही हो ओळखलं तुम्हाला.`

    ⁃    ` अहो कसं ओळखाल मी अमेरिकेतून बोलतीय आणि  मी अक्षरशहा हवेतच उडाले की आत्ता अमेरिकेतून फोन करणारी ही बाई कोण एवढी. जिचा `स्टार माझा` वरती ब्लॉग्जमध्ये पहिला क्रमांक आलेला आहे अशा मुलीनं मला फोन करावा. हे म्हणजे फार कौतुकच वाटलं. तुम्ही छानच काव्य करता. मी म्हटलं `सांगू का, हे माझ नाहीये ही देवाची कृपा आणि आईचे आशीर्वाद आहेत.`    ⁃   

    ⁃    कविता आहे मुरली म्हणून कृष्णाची. म्हणजे घरात कॅलेंडर होतं. कृष्ण मुरली वाजवतोय पण इतकी मोहक त्याची छबी होती की मला त्याच्याकडं बघूनच मला ती कविता सुचली.    ⁃   

सौ. मेधा सोवनी - शुभांगीताई, ती कविता होऊन जाउदे की.

सौ. शुभांगी रानडे -

    कृष्णा वाजव रे मुरली
    मुरलीने भूक नुरली
    कृष्णा वाजव रे मुरली ---- ।।ध्रु।।

    गोपी निघाल्या लवकरी
    जाण्या मथुरेच्या बाजारी
    करण्या गोरस विक्री
    कृष्णा वाजव रे मुरली ---- १

    पेंद्याचंद्या रे बल्लारी
    गाई घेऊनि जा नदीतीरी
    परतुनि या लवकरी
    कृष्णा वाजव रे मुरली ---- २

    गोपी अणिती तक्रारी
    काय कमी रे तुज घरी
    न करी गोरस चोरी
    कृष्णा वाजव रे मुरली ---- ३

    उघडी वदना मुरारी
    दूर सारी रे बासरी
    नवनीत ना अंतरी
    कृष्णा वाजव रे मुरली ---- ४

    विश्वरूपाच्या दर्शनी
    झाली यशोदा बावरी
    हृदयी त्या कवटाळी
    नक्को वाजवु रे मुरली ---- ५

 

सौ. मेधा सोवनी - वा शुभांगीताई, तुमच्या अशा अनेक कविता असतील तर ह्या ज्या कविता तुम्ही केल्या तर असं कधी झालंय का की खरच आज धन्य झाले मी कविता करतेय म्हणून हे काम माझ्या हातनं हे झालं. असं कधी झालय तुमच्याबाबतीत.

सौ. शुभांगी रानडे -  हो. मला वाटतंय असं की कविता करायची म्हणून करते असं माझ्या हातनं होत नाही. तर इतकं दूध उतु गेल्यासारखं मन भरून येतं की ते उतरवलच पाहिजे कुणाच्या पाटीवर. ते दोन शब्द झालेच पाहिजेत. मग इतरांना काहीही वाटू दे माझे तिकडं लक्ष नसतं. मला तसं केल्याशिवाय चैनच पडत नाही आणि याचा मला एक फायदा झालेला आहे की एक कविता मी केली नव्हती, पण प्रसंग असा आला होता की आमच्या नात्यात एकाच्या ठिकाणी घटस्फोटाची वेळ आली होती.

मी म्हटलं, की मी उद्याच येते, दोन शब्द बोलू आपण. मी एक कविता लिहिलीय. मी वाचून दाखविते, मग तुला पटेल तसं कर. ठीक आहे. मग मी गेले त्याठिकाणी. ` तुला नाही ना रहायचं, काही हरकत नाही, तू वेगळी रहा, नवरा वेगळा राहूदे, मुलगी आहे पाच वर्षांची, ती जाऊदे की वा-यावर, काही का त्यांच होईना, तू वेगळी रहा. पण एक पाच मिनिट मला दे माझी कविता ऐक. कारण, इतकं माझ मन भरून आलं होत की माणसाच्या संसारात काही ना काही कमी जास्ती गोष्टी असणारच. आपल्या हाताची पाची बोटं सारखी असतात का गृहीत धरा माझी काय अवस्था आणि नंतर लिहिली ती कविता तिला वाचून दाखवली नि म्हटलं `सांगू का तुला मला काय म्हणायच ते मी शब्दरूप केलंय.`


सुवर्णपट

संसाराचा सुवर्णपट हा कधी न द्यावा उधळोनी
दान कसेही पडले तरीही घ्यावे सकला समजोनी ---- १

पेला अर्धा रिकामा ही खंत करावी कधी न मनी
पेला अर्धा भरलेला हे सूखचि राही भरुनी मनी ---- २

झाले गेले विसरुनी जावे पुढील पाना उलटोनी
नशीबवान हो खरेच आपण नरजन्मा आलो म्हणुनी ---- ३

टाकीचे ते घाव सोशिता देवत्वचि ये दगडाला
सजीव आपण त्यातुन माणुस उणे कुठे मग पुण्ण्याला ---- ४

अर्धनारी त्या नटेश्वरापरि संसारचि तो असे खरा
थोडे इतरा समजुनि घेता रोजचि येई तो दसरा ---- ५

रोजचि दसरा घरात असता आनंदा नाही तोटा
दुसर्‍यासाठी झिजता झिजता चंदनगंधही ये मोठा ---- ६

सदा करावा विचार अपुल्या पुढील पिढीचा तोच भला
हेवेदावे पार पुसोनी मदत करू त्या तरायला ---- ७

आकाशीच्या देवाघरची फुलेच असती अपुली मुले
सुंदर सोज्वळ संस्कारांनी सजवू तयांचे मधुर झुले ---- ८

सुजाण आपण आहात सारे ठाऊक आहे जरि मजला
दोन शब्द हे सांगितल्याविण राहवते ना परि मजला ---- ९

आणि गंमत अशी की ही कविता ऐकताक्षणी ती म्हटली मी येते हं आज संध्याकाळपासून. घरीच रहायला येते


सौ. मेधा सोवनी - 
संसार मोडता मोडता वाचला. तीन आयुष्य डायरेक्टली वाचवलीत. तर तुमच्यासाठी एक मस्त गाणं ( प्लेसहोल्डर ध्वनीफीत नाही)

सौ. शुभांगी रानडे - थॅंक्यू  व्हेरी मच.

सौ. मेधा सोवनी - तर मंडळी, आपण सौ.शुभांगी रानडे यांच्या काही कविता आत्ताच ऐकल्यात. तर किती शब्दामध्ये ताकद असू शकते. दोन जिवांचा मोडणारा संसार आज त्यांच्या त्या कवितेतील शब्दांमुळे तो वाचला. तर ९०.४ एफएमवर आज तुम्ही हा कार्यक्रम ऐकताय. तर शुभांगीताई, कवितासंग्रह दोन तुम्ही प्रकाशित केलेत तर पुढचा मानस काय आहे तुमचा.

सौ. शुभांगी रानडे - पुढचा मानस म्हणजे एक तिसरा संग्रह प्रसिद्ध करण्याचा बेत आहे. म्हणजे मला अस जाणवतं की कदाचित कवितांची संख्या कमी असेल, पहिल्या पुस्तकात १०० होत्या. दुस-यात ६०-६५. त्यात कविता कमी आहेत पण मला अस जाणवतं की  कवितांची उंची वाढलेली आहे हे माझं मला कळून आलं.

सौ. मेधा सोवनी - म्हणजे जसं आपण लिहीत जातो तसतसं नीटसपणा येत जातो.

सौ. शुभांगी रानडे - आणखी प्रतिभा  येत जाते. म्हणजे माझी तरी अशी समजूत आहे.

सौ. मेधा सोवनी -आणखी एक विचारावसं वाटतं की तुम्ही शाळेमधे असताना तुम्ही कॉंप्युटर शिकवत होतात तर त्या दृष्टीनं काही वेगळा प्रयोग केलेला होतात तो जरा सांगा की.

सौ. शुभांगी रानडे -  म्हणजे गंमत अशी माझी झाली की मुलगी दहावीत असताना पहिल्यांदा कॉंप्युटर आलेले होते. मी या डिसिप्लीनमध्ये नव्हते पण आमच्या  घरातनं मला असं काही सांगितलं की नाही बाई, तुला संस्कृत  येतय पण कॉंप्युटर शिकला पाहिजे. मग मी शिकले आणि पहिला प्रयोग करण्यासाठी म्हणून सावरकर प्रतिष्ठान आमि ज्ञानदीपतर्फे आम्ही एक सुट्टीचा वर्ग म्हणून जाहीर केला मे महिन्यात. ज्यावेळी माझी  परिक्षा होती. मुलगी दहावीला होती व तिच्याबरोबरचे किंवा डिप्लोमाला असणारी मुलं अशी साधारणत ३५-४० मुलांचा एक वर्ग घेतला. फी म्हणाल तर किती, महिन्याला फक्त २५ रुपये. आणि मला अगदी आश्चर्य वाटतंय की त्यावेळेला मुलं तशी बरीच मोठी होती. स्वाभाविक आहे. नामजोशी सरांनी सांगितलं बाई, प्रेझेंटी सुद्धा घ्यायची बरं का मग मी उपस्थिती घेतली `उपस्थित, हजर, येस मॅडम,  नो मॅडम` मी एकदम उभी राहिले `फक्त उपस्थित शब्द पाहिजे ज्यांना बाकीचे बोलायचंय त्यांनी वर्गाबाहेर जायला हरकत नाही.` चुपचाप सगळी मुलं. सर म्हटले `बाई काय तुम्ही` पण मुलांना इतका भाग आवडला की मराठीतनं संगणक शिकवणे मला एवढं कळतं की कदाचित शिक्षकी पेशा असल्यामुळे जे आपल्याला येतं ते दुस-याच्या गळी उतरविण्याची कला असेल जे सांगितलं गेलं की मुलांसाठी हा क्लास चांगला घेतला गेला व मग सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला फार आवडला. त्यानंतर   मी घरगुतीच क्लास घेत होते. म्हणजे की ज्यात सगळी मोठी माणसं यायची. लहान नाहीत.


सौ. मेधा सोवनी -
पण तुम्ही मराठीतूनच संगणक शिकलाय का हे कसं डोक्यात आलं.

सौ. शुभांगी रानडे -  कारण त्यावेळी संगणक इंग्लिशमधून शिकणं तसं क्लिष्ट होतं.

सौ. मेधा सोवनी - साधारण केव्हाची गोष्ट ही.

सौ. शुभांगी रानडे -  ही ८५ ची गोष्ट आहे. म्हणजे मी ८५ला पहिला क्लास घेतला. त्या वेळेला असं कळलं की जे आपल्याला कळतं ते आपल्या मातृभाषेत जास्त चटकन लक्षात येतं.यात इंग्लिश मिडियम काही वाईट नाही, हे सगळं मला मान्य आहे. पण जी गोष्ट मातृभाषेतून कळते, त्यात काहीही माणसाला, कितीही हुशार असो, काहीही असो, खरचटलेलं असलं की आईच म्हणतो ना  तो एकदम, तसं होतं त्यामुळे अजूनसुद्धा आम्ही मराठीत टायपिंग करतो त्यात एक्सपर्ट झालो असं म्हणायला काही हरकत नाही. किंवा मराठीत वेबसाईट केल्या जातात. त्या आमच्याइतक्या कोणी केल्या नसतील. आता आमच्याकडे आम्ही त्याच संदर्भात संस्कृतही शिकवायचं मला मुलांना तर आजपर्यंत  मराठी इनटू संस्कृत  अशी डिक्शनरी कोठे अव्हेलेबल नाही. कुठेच नाही. संस्कृत - मराठी आहे संस्कृत - इंग्लिश आहे संस्कृत - गुजराथी आहे हिंदी आहे तरी मराठी इनटू संस्कृत  अशी नाही. की आत्ता दहावीच्या मुलांना ट्रान्स्लेशनसाठी  परिक्षेत १० मार्काचा प्रश्न असतो यासाठी शाळेतील मुलांना उपयोगी पडतील असे १०,००० शब्द काढले आणि  मी आणि माझे मिस्टर असे दोघंही जसं जमेल तसं कॉंप्युटरवर बसायचे आणि ते फीड करायचे. मराठी, इंग्लिश आणि संस्कृत तिन्ही पद्धतीनं केलं. बरं त्यावेळेला जसं आपल्याला ते अल्फबेटिकली करता येत नाही मराठी इनटू संस्कृत. तसं इंग्लिशमधून सोपं असतं. मग त्याच्यासाठी आम्ही स्वतंत्र कोडवर्ड्स घातले होते आणि त्यातनं ते केलं, फार उलट्या पालट्या कोलांट्या उड्या मारल्या, पण ते केलं खरं.

तर आधी करायची होती फक्त डिक्शनरी. पण परत सामासिक शब्द घातले संधी घातले मग सुभाषितं घातली ती सुभाषितं नुसतीच नाही तर मी स्वतः त्यांचा अर्थ लिहून ती म्हटलीयत. म्हणजे अशी सीडी केली की ज्यात सुभाषित मी म्हटलेली आहेत २००. त्याच्यानंतर जे नाटेकरांच्या पुस्तकातसुद्धा शब्द नाहीत ते शब्द लिहून, ते म्हणून दाखविलेत. पण मुलं शाळेतली वाघ मागे लागल्यासारखी म्हणतात म्हणजे संस्कृत शब्द चालविणे जे आहे ते सावकाश म्हणावं लागतं. किंवा धातु सावकाश म्हणावे लागतात पाठ व्हायला. तरी मी कितीही वेळा सांगायची तुम्ही आंधोळीला गेलात ना त्यावेळी म्हणा वेळ वाया घालवू नका. पण ते लक्षातच रहात नसेल कोण जाणे. सर्वनामं म्हटली रोज एक तास स्तोत्ंर म्हटली की जी कायम तुम्हाला उपयोगी पडतील म्हणजे रामरक्षा अथर्वशीर्ष नवग्रह स्तोत्र जी संस्कृतमध्येच आहेत पण मुलांना उच्चाराला आवश्यक आहेत.मग त्याची स्वतंत्र सीडी करून  ते सगळं रेकॉर्डिंग मी माझं माझं केलं. कुणीही दुसरं नव्हतं. म्हणजे टाकून देऊन तुमचे तुम्ही करा पण दुपारी जेव्हा मला सवड असेल तेव्हा माझी मी करायची ते चेक केलं लहानाचे मोठे शब्द करायचे ते घालायचे  दुरुस्त्या म्हणजे कंटेंट आणि  हे सर्व काम माझं मी केलं, नंतर सरांनी ते घालणं ते प्रोग्रॅममध्ये घालून ते वेबवर टाकून सगळ्या जगभर दाखविणे हे काम सरांचे.

सौ. मेधा सोवनी - मराठी इनटू संस्कृत ही जी तुमची डिक्शनरी आहे ती ओपन टू ऑल आहे का


सौ. शुभांगी रानडे -
हो ओपन टू ऑल आहे होहो शिवाय त्याची वेबसाईट आहे पुस्तकाच्या नावाची म्हणजे संस्कृतदीपिका डॉट ओआर जी या नावाची आहे त्याच्यात पुस्तक उलगडून ही वाचता येईल अशीही सोय  केलेली आहे. सगळे शब्द ऐकता येतील सीडीही त्यात बघता येतील. शिवाय पर्सनल हवे तर तेही आम्ही देऊ शकतो. शिवाय शाळांनाही फ्री द्यायची आमची योजना आहे. शेवटी काय आपलं जे ज्ञान आहे जाऊदे ना चार लोकांपर्यंत.

सौ. मेधा सोवनी - तुमचा दृष्टीकोन खूप वेगळा आहे. म्हणजे सुरवातीस मी म्हटलं की नाही की खूप वेगळ्या पद्धतीनं विचार करणारी जी माणसं आहेत. यापैकी शुभांगीताई  या आहेत. आपल्याजवळ असणारं ज्ञान इंटरनेटच्या युगामध्ये हे ज्ञान सगळ्यांपर्यंत पोचणे शक्य आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी काय काय करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. सरांचे त्यासाठी त्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन त्याना लाभलेले आहे. आता मंडळी आपण असं करुया का सरांनी या वेबसाईट कशा पद्धतीने तयार केल्या आणि शुभांगीताईना कशा कशा पद्धतीने साहाय्य केले यासाठी काय काय योजना त्यांनी राबविल्या आणि काय काय योजना त्यांना राबवायच्या आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यासाठी आपण सरांची भेट घेऊया आणि या सगळ्या गोष्टी सरांनाच विचारुया. पण आज आता मात्र आपण थांबूया `शुभांगीताई, खरच आपला वेळ कमी असतानासुद्धा तुम्ही इतक्या या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात. तुमच्या कविताही आम्हाला वाचून दाखविल्यात खूप छान पद्दतीने प्रेझेंट केल्यात त्या आणि या सगळ्यांबद्दल ग्रीनएफएमतर्फे मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते. नमस्कार धन्यवाद.

तर मंडळी आपण शुभांगीताई रानडे या निवृत्त शिक्षिका आहेत एमए संस्कृत झालेल्या तर त्यांची आज मुलाखत घेतली ती ही मुलाखत कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा आणि पुढच्या शुक्रवारी आपण पुन्हा भेटतोय त्यावेळी बहुतेक आपण सरांशी बातचित करू आणि पुढच्या शुक्रवारी जरूर भेटूया निरोप द्या नमस्कार.