नव्या शिक्षणपद्धतीत पूर्वीच्या स्वयंप्रेरणेचा समावेश
ऐतिहासिक काळापासून जुन्या व नव्या पिढीतील संघर्ष हाच ज्ञान व सत्ता संक्रमणास कारणीभूत झाला आहे. असा संघर्ष होणे नैसर्गिक वा स्वाभाविक असून त्यात वावगे काही नाही. नवे ज्ञान, नव्या संकल्पना प्रगतीसाठी अत्यावश्यक आहेत.
मात्र जुन्या चालिरिती वा जीवनपद्धती सरसकट त्याज्य समजणेदेखील चुकीचे आहे. होते काय की जुनी पिढी आपले विचार सोडायला वा नवीन कल्पनांचा स्वीकार करण्यास तयार होत नाही. नव्या पिढीला जुन्या पद्दती कालबाह्य वाटतात व सत्तेच्या वा सामर्थ्याच्या जोरावर जुन्या पद्धतींचा नाश करण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते. मात्र नव्या पिढीस अनुभव कमी असल्याने वाईटाबरोबर चांगल्याचाही नाश त्यांच्याकडून होऊ शकतो.
वालचंद कॉलेजमध्ये प्राध्यापकांमध्ये असणारे सलोख्याचे व सहकार्याचे वातावरण स्वायत्ततेच्या नव्या बदलांमुळे विस्कटले गेले. विद्यार्थ्यांशी शिक्षकांबरोबर असणारे जिव्हाळ्याचे संबंध संपून अधिकार व कर्तव्ये यांच्या काटेकोर नियमांमुळे नवी बंधने आली. उपस्थिती, परीक्षा व शिकविण्याच्या पद्धतीत साचेपणा आला.
पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीत असणारा मोकळेपणा व स्वातंत्र्य नसल्याने खेळ, स्पर्धा, सामाजिक सेवा, कन्सल्टेशन, शैक्षणिक सहली व संमेलने यापेक्षा पूर्वनियोजित व निर्धारित वेळापत्रकानुसार अभ्यासक्रम पुरा करणे याला शिक्षक व विद्यार्थी महत्व देऊ लागले. साहजिकच भोवतालचा समाज, उद्योग व इतर संस्था यांच्या अडचणी व गरजा पूर्ण करण्याची क्षमता व इच्छा कमी होऊन कॉलेजची पूर्वीची संवेदनशीलता व प्रतिष्ठा जाऊन त्याजागी आत्मकेंद्रित व स्वयंभू उच्च शिक्षणसंस्थेचा दर्जा कॉलेजला प्राप्त झाला. शिक्षकही विद्यार्थ्यांबरोबर वेळ न घालवता आपली गुणवत्ता वाढीकडे जास्त लक्ष देऊ लागले.
कॉलेजच्या नावलौकिकामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणे सोपे झाले तरी नवनिर्मितीची वा स्वयंउद्योगाची प्रेरणा व सामाजिक बांधिलकीची जाणीव कमी झाली.
जुन्या निवृत्त प्राध्यापकांना याची खंत वाटू लागली व त्यातूनच
नवनिर्मिती व स्वयंउद्योग यांची पुनर्स्थापना करण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी ठरविले.
ज्ञानदीप फौंडेशनने याबाबतीत पुढाकार घेऊन माजी उद्योगप्रिय प्राध्यापक आणि व्यवसायात यशस्वी झालेले माजी विद्यार्थी यांच्याशी चर्चा करून एक कृतिगट स्थापन केला आहे. सध्याच्या नव्या शिक्षणपद्धतीत ही नवी संकल्पना कशाप्रकारे संलग्न करता येईल याविषयी विचारविनिमय चालू आहे. संस्थात्मक स्वरूप देऊन हे कार्य अबाधित चालावे व इतर शिक्षणसंस्थांनाही त्याचा लाभ घेता यावा. यासाठी ही योजना आहे. आपणही याबाबत आपले विचार मांडावेत ही विनंती. - डॉ. सु. वि. रानडे,