बालक की पालक
प्रॊढत्वी निज शेशवास जपणे बाणा कवीचा असे.
शेशव अथवा बालपण हे कुतुहल, ऒढ, ध्यास, हट्ट व नवनिर्मिती यांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे हे शेशव जपणे नवनिर्मिती करणार्या कवीला आवश्यक असते.
माणूस जसजसा प्रॊढ होऊ लागतो. तसतसे त्यातील बालपण विरून जाते. त्याची जागा सभ्यतेच्या व प्रतिष्ठेच्या अलिप्तपणात व नंतर वृद्धपणी उपदेश करणार्या पालकात परिवर्तित होते. कवी मात्र म्हातारा झाला तरी त्याचे मन बालकाप्रमाणेच नव कल्पनांबाबत लोभी व परिसराशी संवेदनशील रहाते. जी गोष्ट कवीची तीच लेखकाची व कलाकाराची असते.
म्हातारा माणूस बालकाप्रमाणे काही करू लागला की ’त्याला म्हातारचळ लागलाय’ अशा शेलक्या विशेषणाने इतर मनानेही म्हातारे झालेले त्याची टर उडवितात वा त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करतात. काहीजण ’हा काय पोरकटपणा चाललाय?’ अशी टिप्पणी करून वर्तन सुधारायचा सल्ला देतात.
नवीन काही करायचे ते फक्त तरुणांनी व लहान मुलांनी अशी ठाम समजूत झालेल्यांच्या काही प्रतिक्रिया अशाही असतात.
. नाही ती उठाठेव
. हे काय नवीन खूळ
काही ’आम्हाला शहाणपण शिकवू नका’ असे स्पष्ट बजावतात.
तर काही ’ याचा काही उपयोग होणार नाही. हे असेच चालायचे.’ असा निराशॆचा सूर लावतात.
पण आपल्याला लहान मुलांत नवनिर्मिती, संवेदनशीलता व वॆज्ञानिक विचारसरणी रुजवायची असेल व कवी, लेखक, कलाकार व शास्त्रज्ञ घडवायचे असतील आपणही आपला सर्व मोठेपणा विसरून त्यांच्या भावविश्वाशी जवळीक साधायला हवी. केवळ उपदेश न करता त्यांच्या सारखे लहान होऊन प्रतिष्ठेची लाज न बाळगता आपण त्यांच्यात मिसळले तरच त्यांच्याशी आपली मॆत्री जुळेल. मग आपण आपल्या अनुभवाच्या आधारावर त्यांच्या वर्तनात योग्य तो बदल घडवून आणू शकू,
बालादपि सुभाषितम् ग्राह्यम् ।
असे म्हणतात त्याप्रमाणे आपल्यालाही काही नव्या गोष्टी कळतील त्यांच्या अंतरंगाचा व आवडीनिवडीचा शोध आपल्याला घेता येईल.
याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे असे लहान मुलांच्यात मिसळले व त्यांच्याशी लहान होऊन खेळले की आपले गमावलेले बालपण आपल्याला परत मिळेल व मरगळलेल्या व निवृत्त जीवनात निखळ आनंदाची अनुभूती येईल व उत्साहाने काहीतरी नवीन करावेसे वाटेल.
निदान मलातरी याचा अनुभव आला आहे व त्याचे सर्व श्रेय मी माझ्या छोट्या नातवंडांना देतो. त्यांनी मला लहान व्हायला शिकवले. त्यांच्या डोळ्यांनी जगाकडे बघताना मी माझे म्हातारपण विसरून जातो.
मग पालकापेक्षा बालक होऊन रहाणे, शिक्षकापेक्षा विद्यार्थी होऊन जगणे किती आनंददायी आहे याची प्रचिती मला आली आहे. त्यामुळे कोणी पालकासारखा उपदेश केला तरी मला काही वाटत नाही. मी त्यांच्या सांगण्याचा गांभीर्याने विचार करतो माझ्या वागण्यात सुधारणा वा बदल करतो.
मात्र कोणी मला पालक म्हणून मान दिला वा सल्ला मागितला तर मला संकोचल्यासारखे होते व आपण जगाच्या दृष्टीने खरेच म्हातारे झालो आहोत हे उमगून आता माझ्याकडून बालकापेक्षा पालक म्हणून वागणे अपेक्षित आहे हे लक्षात येते.
तरी माझे बालक मन त्याविरुद्ध बंड करून उठते व मी बालक वा विद्यार्थीच राहणार असा हट्ट करते.