अरविंद देशपांडे - हळव्या कवीमनाचे उद्योजक व समाजसुधारक
वालचंद कॉलेजच्या असोसिएशन ऑफ पास्ट स्टुडंट्स्चे माजी अध्यक्ष व कोल्हापूरमधील प्रथितयश उद्योजक श्री. अरविंद उर्फ आबा देशपांडे यांचेशी ज्ञानदीप फॊंडेशनच्या फॊंडेशनच्या संशोधन प्रकल्पासंदर्भात यांचेशी दिलखुलास गप्पा करण्याचा काल योग आला, प्रा, भालबा केळकर, अरविंद यादव आणि शिवाजी विद्यापिठाचे श्री. गिरीश कुलकर्णी असे आम्ही सर्व शिरोलीतील त्यांच्या कारखान्यात जमलो होतो.
सांगली परिसरात तंत्रज्ञान संशोधन व नवनिर्मिती याचे केंद्र स्थापन करण्याबाबत त्यांची मते जाणून घेण्यासाठी ही बॆठक आयोजित करण्यात आली होती.
सुरुवातीला मी त्यांना पूर्वी त्यांच्या बंगल्यावर भेटल्याची आठवण करून दिली व वालचंद माजी विद्यार्थी संघटनेमधील त्यांच्या कार्याबद्दल आभार व्यक्त केले. प्रत्येक माजी विद्यार्थ्याने ५००० रु. या संघटनेला द्यावेत तसेच प्रत्येक विभागात माजी विद्यार्थ्यांनी महिन्यातून एक तरी व्याख्यान देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी योजना मांडली होती मात्र फारच थोड्या लोकांनी यास प्रतिसाद दिला. त्यांनी ’मला काय मिळणार? ’ यासारखी लोकांची मानसिकता यात कशी आडवी आली याची खंत व्यक्त केली. आपले कॉलेज हे आपल्या आईसारखे आहे व त्यापासून काही मिळण्याची अपेक्षा करणे कसे चूक आहे ते त्यानी दाखवून दिले.
त्यांनी स्वत: त्यांच्या जन्मगाव मांगले या खेडेगावातील शाळेत डिजिटल स्कूलसाठी त्यांनी आपल्या गजेंद्र ट्रस्टमधून कसे साहाय्य केले ते सांगितले.
सहज बोलता बोलता त्यांनी झाडाचे उदाहरण दिले व झाड होणे किती अवघड असते हे काव्यातून सांगितले.
प्रा. भालबा केळकरांच्या नवनिर्मिती केंद्र कल्पने विषयी ते म्हणाले यासाठी फार मोठे भांडवल व व्यवस्थापन यंत्रणा उभारावी लागेल व एकट्या दुकट्याला हे शक्य नाही. शिवाजी विद्यापिठाकडे अशी यंत्रणा आहे व सध्याचे कुलगुरू अशा प्रकल्पाला त्यांच्या विकास योजनेत स्थान देऊ शकतील तरी आपण त्यांच्याशी याविषयी चर्चा करावी. ते स्वत: या संदर्भातील अभ्यासगटात एक प्रतिनिधी असल्याने त्याविषयी कुलगुरूंशी बोलण्याचे आश्वासन दिले.
शिवाजी विद्यापिठाचे श्री. गिरीश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात अडचणी येतात व त्या दॄष्टीने शिक्षणसंस्था व उद्योग यात संपर्क व संवाद साधण्यासाठी व्यवस्थापन केंद्र निर्माण केल्यास शिवाजी विद्यापीठ त्यास संलग्न करून घेऊ शकेल असे मत व्यक्त केले.
प्रा. केळकर यांनी सीमेवर लढणारे सॆनिक आणि विद्यार्थी यात दुवा निर्माण करण्यासाठी प्रत्येक गावातील सॆनिकांच्या घरी विद्यार्थ्यानी भेटी देऊन सॆनिकांना त्यांच्या घराची खुशाली कळवावी. यातून विद्यार्थ्यांना सॆनिकांच्या कार्याची व त्यांच्या कुटुंबांना सहन कराव्या समस्यांची जाणीव होईल. सॆनिक शहीद झाल्यावर एकत्र जमणार्या लोकांपेक्षा हे कार्य निश्चितच अधिक उपयुक्त व संरक्षण दलाविषयी विद्यार्थ्यात आदर व आपुलकी निर्माण करण्यात यशस्वी होईल असे मत व्यक्त केले. श्री. देशपांडे यांना ही कल्पना आवडली व विद्यापिठातर्फे यास चालना मिळू शकेल या दॄष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
ज्या उद्देशाने आम्ही श्री. देशपांडे यांचेकडे आम्ही गेलो होतो त्यापेक्षा वेगळ्या पण मॊलिक सूचना व कल्पना आमच्या गाठी जमा झाल्या.