स्वप्न हरित नगरीचे
असावे सुंदर आपुले गाव असे प्रत्येकालाच वाटत असते. परंतु आता खेडेगाव काय किंवा शहर काय, दोन्ही ठिकाणी राहणाया लोकांच्या दृष्टीने हे एक दुरापास्त स्वप्न बनले आहे.
वाढत्या औद्यौगीकरणामुळे मोठ्या शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या लोकसंख्येचा ताण शहरातील निवासव्यवस्था, रस्ते, पाणीपुरवठा, वीज यासारख्या पायाभूत सुविधांना सहन करणे अशक्य झाले आहे. शहरातील बहुतेक सर्व मोकळ्या जागा, क्रीडांगणे, बागा व जुन्या इमारती यांच्याजागी नव्या टोलेजंग इमारती उभ्या रहात आहेत.
एका जुन्या एक मजली इमारतीच्या जागी बहुमजली इमारत झाली तेथे राहणाया लोकांची संख्या कित्येक पटीनी वाढते. साहजिकच त्यांची पाण्याची गरज त्याचप्रमाणात वाढते. मात्र पाणीपुरवठ्याचा नळ मोठा करता येत नाही. कारण तो शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील एक छोटा भाग असतो. त्यामुळे मोठ्या व्यासाचा नळ बसविला तरी पाणीपुरवठा वाढू शकत नाही. जी गोष्ट पाण्याची तीच सांडपाणी वाहून नेणाया गटारांची वा नळांची. पाणी पुरवठ्यासाठी बोअर वेल, टाकी व पंपाची व्यवस्था करता येते मात्र तयार होणारे सांडपाणी शहराच्या मलजल व्यवस्थेत सोडणे बहुधा शक्य होत नाही. कचरा संकलनाचीही वेगळी व्यवस्था करावी लागते. नव्या इमारतींच्या किंमती अधिक असल्याने त्यात राहणाया लोकांचे जीवनमानही उच्च असते. त्यांच्याकडे स्कूटर व मोटार वाहने असतात. त्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करावी लागते. रस्त्यावरील वाहतुकही वाढते. रस्ता अधिक रुंद व जास्त टिकावू करावा लागतो. अधिक विजेची गरज भागविण्यासाठी उच्च दाबाच्या तारा व ट्रॅन्स्फ़ार्मर बसवावे लागतात.
एका इमारतीच्या बाबतीत असे होत असेल तर शहरात ठिकठिकाणी अनेक इमारतींचे असे रुपांतर झाल्यास शहराची सर्व सुविधा यंत्राणाच कोलमडून पडते. याशिवाय अनेक जुन्या इमारती पाडण्याचे वा नवीन बांधण्याचे काम चालू असल्याने ट्रकांची वाहतूक, जुने नवे बांधकाम साहित्य व कामगारवस्ती यांचाही ताण शहर व्यवस्थेवर पडतो. शहरातील लोकसंख्या वाढते तशी जीवनावश्यक वस्तूची गरजही वाढते. ती पुरविण्यासाठी मोठी दुकाने, मॉल यांचीही त्यात भर पडते. करमणूक व इतर सुखसोयीही आहे त्या जागेत निर्माण केल्या जातात. परिणामी शहराचे मुळचे रूप नष्ट होऊन त्याला कांक्रीटच्या जंगलाचे रूप येते.
पूर्वीचे खेडेगाव म्हणजे एक रम्य, निसर्गाच्या सान्निध्यात असणारे वसतीस्थान असायचे. गावाच्या प्रवेशद्वाराशी कमान, गावाच्या मध्यभागी एक देऊळ, वड, चिंच वा पिंपळाच्या झाडाखाली असणारा कट्टा, चार गल्ल्या वस्ती, बाजूला एक ओढा, आणि सभोवताली पसरलेली शेती आणि मळे. रस्ते साधेच असले तरी आपले वाटायचे. साध्या दगडा-मातीची वा कुडाची घरेदेखील विलक्षण सुखद असायची. गावातील माणसे, त्यांचे विचार व व्यवहार एका घट्ट विणीत गुंफ़ल्यासारखी एकसंध वाटायची. पारंपारिक जत्रा हे गावाचे आकर्षण असायचे. आता या खेडेगावाचे रूप पार पालटले आहे. शहरी संस्कृतीचे आघात त्यावर झाले आहेत.
पूर्वीचे शहर म्हणजे खेडेगावातल्या लोकांना आकर्षण असायचे. मोठ्या आकर्षक इमारती, रुंद व स्वच्छ रस्ते, बागा, क्रीडांगणे, सरकारी कचेया, वाचनालय व शाळा- कॉलेजच्या देखण्या इमारती, नदी असेल तर रुंद बांधीव घाट, घाटावरील देवळे, सार्वजनिक सभांसाठी खास पटांगणे, एक ना दोन. आठ्वड्याच्या बाजारासाठी वा नाटक- सिनेमा पाह्ण्यासाठी खेडेगावातील लोक शहरात यायचे.
पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत दिवसाच्या विविध कालखंडांत निसर्ग विविध रुपे धारण करीत असतो. पहाटेचे दंव, उष:कालची लाली, पक्षांचे कूजन, उमलत्या फ़ुलांचे ताटवे, दुपारचे ऊन, संध्याकाळचा गार वारा आणि रात्री आकाशातील नक्षत्रांचा मनमोहक नजारा या गोष्टींना शहरातील माणूस पारखा झाला आहे. या नैसर्गिक सुखकारक गोष्टीऎवजी दूरदर्शनवरील आभासी दृश्यांवर त्याला समाधान मानावे लागत आहे. कृत्रिम वायुवीजन व प्रकाशयोजना तसेच अयोग्य घरबांधणी व अंतर्गत सजावट यामुळे घरातील प्रदूषण्ही वाढले आहे. रस्त्यावरून पायी चालणायाला गर्दी, गोंगाट, प्रदूषित हवा, सांडपाण्याची दलदल, कचयाचे ढीग यातून मार्ग काढावा लागत आहे. तर वाहन वापरणायाला ट्रॅफ़िक जॅम, वेगात चालणारी वाहने व धोकादायक खाचखळग्यांचे रस्ते व पार्कींग समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वृद्ध व्यक्तींना सुरक्षितपणे हिंडण्यासाठी रस्ते नाहीत. विरंगुळ्यासाठी बागा नाहीत. मुलांना खेळण्यासाठी मोक्ळ्या जागा वा क्रीडांगणे नाहीत.
यावर काहीच उपाय नाही का? सर्वसामान्य माणसाचे सुंदर शहराचे स्वप्न हे स्वप्नच राहणार का? पर्यावरणाची आपण काळजी घेतली व त्या प्रमाणे गृहरचना व शहररचना करण्याचा निश्चय केला तर हे स्वप्नही सत्य ठरू शकेल. आपल्या सुखी जीवनासाठी व आपल्या भावी पिढ्यांसाठी हे अत्यावश्यक आहे.