गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: ।
आदर्श शिक्षक हा शिक्षक असतो. त्याला जात नसते. त्याला धर्म नसतो. त्याला पक्ष नसतो. त्याची निष्ठा फक्त ज्ञानावर असते. ज्ञान देणे हाच त्याचा धर्म, हाच त्याचा पक्ष. शिक्षणव्यवस्थेत त्याचे स्थान परमोच्च आहे.
शिक्षणसंस्था, संस्थापक, व्यवस्थापक वा नियंत्रक मंडळ, जागा व इमारती, सोयी सुविधा ह्या फक्त शिक्षणास साहाय्यकारी आहेत. साहाय्यकारी घटकांमध्ये वाद निर्माण झाले तर शिक्षण प्रक्रियेत अडचणी येतात. शिक्षक हाच खरा मालक आहे हे साहाय्यकारी घटकांच्या लक्षात येत नाही.
\
विद्यार्थी शिक्षकाकडून विद्या प्राप्त करतो. त्याच्या जोरावर आपला व्यवसाय, धंदा, नोकरी मिळवतो. मिळालेल्या विद्येचा वापर करून धन, संपत्ती व समृद्धी मिळवून समाजात स्थिरस्थावर होतो. समाजाचे नेतृत्वही करतो. मात्र शिक्षक आहे तेथेच राहतो. त्याचे विद्यादानाचे कार्य आयुष्यभर चालू असते. तो शिक्षक असला तरी तो विद्यार्थीही असतो. अद्ययावत ज्ञान देता यावे यासाठी त्याला विद्यार्थी असावेच लागते.
या शिक्षकांच्या कल्याणाची जबाबदारी माजी विद्यार्थ्यांनी उचलायला हवी. केवळ प्रासंगिक हार, तुरे देऊन सत्कार करण्यापेक्षा त्यांचे विद्यादानाचे कार्य निर्वेध चालू राहण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आमच्या कॉलेजच्या प्रा. एच. यु. कुलकर्णी यांनी याबाबतीत आदर्श घालून दिला आहे. आपल्या शिक्षकांसाठी गुरुदक्षिणा नावाचे घर बांधून देण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले ते खरोखर प्रशंसनीय आहेत. अर्थात ते स्वत: शिक्षक असल्यानेच त्यांना शिक्षकांच्या योगदानाची जाण होती.
ज्ञानदीप फॊंडेशनने त्यांची ही शिकवण लक्षात घेऊन वालचंद हेरिटेज इनोव्हेशन सेंटर या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. यामध्ये वालचंद कॉलेजमधील सर्व माजी शिक्षकांची माहिती संकलित करून ती माजी विद्यार्थ्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे. शाळा, कॉलेज व सर्व शिक्षणसंस्था यातील माजी शिक्षक व माजी विद्यार्थी संघटना यांचे संवेदनशील व्यापक जाळे तयार करून जिज्ञासा, नवनिर्मिती व उद्योगशीलतेस चालना देणे, शिक्षणव्यवस्थेतील सध्याचे परिक्षा व नोकरभरतीचे उद्दीष्ट बदलून स्वयंउद्योजक बनण्यासाठी योग्य ते उपाय सुचविणे हे कार्य केले जाईल.
गेले दोन महिने याच उद्देशाने विविध माजी ज्येष्ठ उपक्रमशील प्राध्यापक तसेच प्रथितयश उद्योजक यांच्याशी चर्चा करून या योजनेविषयी त्यांची मते जाणून घेतली. पलूसच्या शाळेत विज्ञान कृतीसत्र तसेच वालंद कॉलेजमध्ये या विषयावर एक परिसंवादही घेण्यात आला. या सर्व अनुभवावर आधारित एकूण योजनेचा स्थूल आराखडा बनविण्यात आला. मुख्यत्वे माजी शिक्षकांनी यात पुढाकार घेतल्याने कल्पनाविलास व विकास खूप झाला. भावनिक इच्छाशक्तीही प्रबळ असल्याचे जाणवले. मात्र उद्योजक व व्यावसायिकांनी प्रथम आर्थिक बाजू भक्कम करण्याचा इशारा दिला. हा उपक्रम स्थायी स्वरूपात कार्यरत व्हायचा असेल तर त्याला जागा, मनुष्यबळ व नॆमित्तिक खर्च भागविण्यासाठी शाश्वत उत्पन्न स्रोताची व्यवस्था अत्यावश्यक असल्याचे ध्यानात आले.
शिक्षक हा यशस्वी व्यावसायिक होऊ शकत नाही हे मला गेल्या २० वर्षांच्या अनुभवावरून कळून चुकले आहे. समाजही आपल्याकडे शिक्षक म्हणूनच पाहतो. प्रा. भालबा केळकरांनी आपल्या नवनिर्मितीच्या तळमळीतून एआर ई चा उद्योग उभा केला मात्र तो स्थायी राहू शकला नाही. वालचंद हेरिटेज इनोव्हेशन सेंटर हा तर मोठाच प्रकल्प आहे व संकल्पनेचे ज्ञान व प्रयत्न करण्याची तयारी असली तरी व्यावसायिक दृष्टीकोन नसल्यामुळे तो प्रत्यक्षात आणण्यासाठी उद्योजक व व्यावसायिकांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
मग यासाठी धनवानांकडे हात पसरण्याची वेळ येऊ नये या दृष्टीने सांगलीचे लाडके नेते मा. वसंतरावदादा पाटील यांनी सुरू केलेल्या सहकार चळवळीचा आधार घेऊन स्वत:च्या पायावर आपली सहकारी संस्था स्थापन करून कार्यास सुरुवात करावी असे ठरले.
अशा कार्याचे महत्व पटलेल्या व त्यासाठी आपले योगदान देऊ इच्छिणार्या समविचारी व्यक्तींची सहकारी संस्था स्थापन करावी, प्रतिव्यक्ती दरवर्षी ५००० रुपये अशी सभासद वर्गणी ठेवावी. किमान २० सभासद मिळाल्यास दरवर्षी एक लाखाची सोय होऊ शकेल व त्यातून काही कार्य उभे राहील. सहकारी सोसायटीच्या नियमाप्रमाणे सर्वांना समान अधिकार देऊन त्यातून कार्यकारी मंडळाची निवड करावी व कार्यास स्थायी रूप द्यावे असा विचार आहे.