आजची शिक्षणपद्धती - परकियांचे अंधानुकरण


आपण नेहमी म्हणतो की  आजकालचे विद्यार्थी केवळ परीक्षार्थी झाले आहेत व त्यांचे लक्ष विषयांचे ज्ञान मिळविण्याऎवजी  परिक्षेत जास्त मार्क कसे मिळतील याकडे असते. त्यामुळेच क्रमिक पुस्तके व पुरवणी साहित्य  न वाचता गाईड वापरण्याकडे त्यांचा कल असतो.   याबाबतीत आपण विद्यार्थ्यांना  दोष देतो. पण विद्यार्थ्यांच्या अशा वागण्यास सध्याची शिक्षणपद्धती पूर्णपणे जबाबदार  आहे हे समजून घेतले पाहिजे.

शालेय शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे  वैयक्तिक लक्ष देणे शक्य असते व तेथे  निरंतर  मूल्यमापन पद्धती वापरून विद्यार्थ्यांना योग्य मानांकन दिले जाऊ शकते मात्र कॉलेजमध्ये  विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरविण्यासाठी परिक्षेतील यश हा एकमेव मापदंड वापरला जातो.  परिक्षेच्या प्रश्नपत्रिकाही ठराविक छापाच्या झाल्याने व वस्तुनिष्ठ प्रश्नांचे महत्व  गरजेपेक्षा वाढून, माहितीपर प्रश्नांची संख्या कमी झाल्याने  विद्यार्थ्यांना संभाव्य प्रश्नांचा अंदाज करणे  व केवळ घोकंपट्टी करून जास्त मार्क मिळविणे सहज शक्य झाले आहे. साहजिकच जे विषय समजण्यासाठी  पाठांतराएवजी त्याचा सखोल अभ्यास करतात ते या स्पर्धेत मागे पडू शकतात. सृजनशीलता व  संशोधन वृत्तीचे संवर्धन हे ज्ञान संपादनाचे   मूळ उ्द्दीष्ट या परिक्षाधिष्ठित शिक्षण पद्धतीत साध्य होऊ शकत नाही.


    अभ्यासक्रमासाठी नेमलेले  विषय व त्यातील माहिती जुनी, कालबाह्य व उद्योग व्यवसायास अनुरूप नसणे हाही दोष आपल्या  शिक्षणपद्धतीत आढळतो. विषय शिकविणार्‍या शिक्षकांच्या इच्छेनुसार असे अभ्यासक्रम बनविले  जातात. त्यावर विचारलेले प्रश्नही तेच तेच असतात.  इंटरनेटवर सर्व विषयातील अत्याधुनिक ज्ञान मिळू शकते. मात्र बहुतांश शिक्षक  या अद्ययावत ज्ञानकोषाचा वापर न करता क्रमिक पुस्तकांचाच वापर शिकविण्यासाठी करतात.  शिक्षक प्रगत ज्ञानाशी अवगत नसेल, बाह्य जगात आवश्यक असणार्‍या माहिती व कौशल्याचे  त्याला ज्ञान नसेल तर अभ्यासक्रमही तसेच मागासलेले राहतात. परिणामी मार्क जास्त मिळूनही  विद्यार्थ्याचे ज्ञान कौशल्य अपेक्षेप्रमाणे वाढलेले नसते.


  त्यामुळेच असेल कदाचित. पण परिक्षेत उत्तम गुण मिळवून  पास झालेले विद्यार्थ्यांत  उद्योग व व्यवसायासाठी  लागणारी पात्रता आढळत नाही. बर्‍याच वेळा कमी गुण असलेले विद्यार्थी याबाबतीत अधिक  योग्य व सरस असतात. मात्र दुर्दैवाने अशा विद्यार्थ्यांना उद्योग वा व्यवसायात गुणांकन  स्पर्धेमुळे नोकरी मिळणे दुरापास्त होते.

  शिक्षणाचा हेतू विशि्ष्ठ  विषयातील ज्ञान संपादन करणे व त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करून समस्यांचे निराकरण  करणे व जीवन अधिक सुसह्य, सुखकर व सुरक्षित बनविणे हा आहे ही गोष्ट आपण विसरून गेलो  आहे. परिक्षा पास होणे व चांगल्या पगाराची नोकरी मिळविणे हे एकमेव उद्दीष्ट आज विद्यार्थ्यांसमोर  आहे. साहजिकच मनासारखी नोकरी नाही मिळाली की निराशा, आर्थिक विवंचना  व इतरांकडून अवहेलना याला सामोरे जावे लागते. नोकरीच्या  कमी संधी, नोकरभरतीतील भ्रष्टाचार व नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांची प्रचंड संख्या  यामुळे बेरोजगारांचे प्रमाण अतिशय वाढले आहे. यातूनच नैराश्यातून आत्महत्या, गुन्हेगारी,  व्यसनाधीनता, हिंसा व गुंडगिरी यांचे प्रमाणही वाढीस लागले आहे. सर्वसामान्य जनतेची  व सार्वजनिक मालमत्तेची सुरक्षाही यामुळे धोक्यात येत आहे.

बहुराष्ट्रीय कंपन्यात नोकरीची ओढ

बहुराष्ट्रीय कंपन्या ऎषारामाचे जीवन व भरपूर पगार देऊ शकतात. यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष अशा नोकर्‍या मिळवण्याकडे असते. मात्र या कंपन्या आपल्या सर्व साधनसंपत्तीचा वापर करून व कमी मनुष्यबळ लागणार्‍या रोबोटिक तंत्रज्ञानाचा व संगणक प्रणालींचा वापर करीत असल्याने त्यांना फार कमी कर्मचार्‍यांची आवश्यकता असते.


परिणामी अशा नोकर्‍यांच्या मागे लागलेल्या लाखॊ पदवीधरांच्या पदरी निराशा येते. तरीदेखील अशा नोकर्‍या देण्याचे आमिष दाखवून शिक्षणसंस्था सरसकट सर्वांना याच प्रवाहात आणून सोडतात. भारतातील बरेच उद्योग, व्यवसाय व बँकांसारख्या आर्थिक संस्था आंतरराष्ट्रीय यांत्रिक व संगणकचलित पद्धतींचा वापर करीत असल्याने तेथेही मनुष्यबळाची आवश्यकता खूप कमी झाली आहे.

याउलट आपल्या समाजात व परिसरात मर्यादित तंत्रज्ञानाचा वापर करून श्रमाधिष्ठीत कार्यपद्धतींचा विकास करण्यास खूप आव आहे. साधी कचरा समस्या हे त्यावरचे उत्तम उदाहरण आहे.  स्वच्छता व कचरा निर्मूलनासाठी आवष्यक ती आरोग्यसंरक्षक्ल साधने वापरून मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला तर स्थानिक रोजगाराची समस्या बर्‍याच प्रमाणात सुटू शकेल. शेती पारंपरिक उपकरणे व यांत्रिक साधने यांना अधिक कार्यक्षम बनविणे सहज शक्य आहे .

भारतात मनुष्यबळाप्रमाणेच पशुधनही अमर्याद आहे. त्यांचा उपयोग न करता यांत्रिक साधनांचा उपयोग उद्योगाला आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरत असला तरी राष्ट्राच्या दृष्टीने पशुधनाचाही सुयोग्य वापर करण्याचे तंत्रज्ञान आज हवे आहे. त्या संदर्भात पूर्वी  स्कूल ऑफ अप्लाईड रिसर्च या वालचंदच्या प्राध्यापक - विद्यार्थ्यांचा सहभाग असणार्‍या संस्थेने  ’बलवान बॆलगाडी’ विकसित केली होती याची आठवण झाली.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्र

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आज असंख्य संधी उपलब्ध आहेत मात्र त्या छोट्या उद्योग व व्यवसायांसाठी आहेत. व्यापारी व छोटे उद्योग यांच्यासाठी साध्या स्थानिक भाषांमध्ये संगणकप्रणाली विकसित करणे हे एक मोठे क्षेत्र आहे. आपले साहित्य, कला, संस्कृती यांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी तर असंख्य संधी आहेत. संगणकावर भारतीय भाषेत मजकूर टाईप करणे, भारतीय व परदेशी भाषांमधील साहित्याचे व व्यवसायविषयक  माहितीचे भाषांतर करणे, भारतीय चित्र व शिल्पकला, संगीत व नाट्य, लोकव्यवहार व सांस्कृतिक संचित ज्ञान सार्‍या जगात पसरावे यासाठी वेबसाईट व मोबाईल ऍप बनविणे, छोट्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादन करण्याचे शिक्षण देणे अशी असंख्य कामे आज अर्धकुशल स्तरावरील युवकांसाठी उपलब्ध आहेत.


बुद्धीमान व उच्चशिक्षित युवकांनाही भारतातील अनेक सामाजिक, पर्यावरणीय व ऊर्जा, तसेच आरोग्यविषयक समस्यांवर स्थानिक पातळीवर उपयुक्त ठरतील अशा संगणक प्रणाली विकसित करण्याचे मोठे क्षेत्र खुले आहे. केवळ इन्फोसिस, विप्रोसारख्या संस्थात कोडमंकी म्हणून काम करण्यापेक्षा या क्षेत्रात त्यांनी आपली बुद्धी वापरली तर आज आपल्याला परदेशी तंत्र व संगणक ज्ञानावर अवलंबून रहावे लागणार नाही.


याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे आपला भारत खर्‍या अर्थाने स्वयंपूर्ण होईल. सर्व हातांना काम मिळेल, शहरीकरण थांबेल व सर्व परिसराचा सर्वांगीण व चिरस्थायी विकास होईल.

संगणक युगाच्या सुरुवातीपासून ज्ञानदीपने स्थानिक गरजांना सर्वात महत्वाचे स्थान देऊन संगणक शिक्षणाचा प्रयत्न केला. पण येथे शिकलेले विद्यार्थी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी गिळंकृत केले. त्यामुळे ज्ञानदीपची स्थिती एखाद्या शाळेसारखी वा रेल्वे प्लॅटफॉर्मसारखी राहिली. विद्यार्थी पुढे जातात पण शाळा तेथेच राहते, रेल्वे पुढे जाते पण प्लॅटफॉर्म तेथेच राहतो. अर्थात याबाबतीत मला काही दु:ख  नाही. उलट भोवतालची परिस्थिती, विद्यार्थ्यांची मानसिकता व स्थानिक चिरस्थायी विकासाची गरज यांचे यथायोग्य आकलन झाल्याने शिक्षणव्यवस्थेला नवी दिशा देणे आवश्यक आहे हे उमजले. ज्ञानदीप फॊंडेशनने हेच एकमेव उद्दीष्ट आता आपल्या नजरेपुढे ठेवले आहे.