हिंसक दंगली हे शिक्षकांचे अपयश
महात्मा गांधी आणि भगवान गॊतम बुद्ध यांनी जगाला अहिंसेचा व शांततेचा संदेश दिला.
आपले राज्य सोडून अहिंसा व शांततेचा प्रसार करणार्या सम्राट अशोकाचे चक्र आपल्या तिरंगी झेंड्याच्या मध्यभागी आहे.
भारतीय शिक्षणक्रमात महात्मा गांधी आणि गॊतम बुद्ध यांच्या या शिकवणीला महत्वाचे स्थान दिले आहे. तरीदेखील तथाकथित सुशिक्षित जेव्हा हिंसक दंगली घडवितात वा त्याला उत्तेजन देतात वा त्याचे समर्थन करतात तेव्हा आपल्या शिक्षणपद्ध्तीत काही महत्वाच्या उणीवा राहिल्या आहेत किंवा शिक्षकांनाच या गोष्टींचे महत्व कळलेले नाही असे दिसते. येथे दोष हा दंगली वा नासधूस करणार्या लोकांचा नसून त्यांना शिकविणार्या शिक्षकांचा आहे असे मला वाटते.
सध्या शिक्षणसंस्थाही स्वार्थी राजकारणात गुंतल्या असून शिक्षकांमध्येही विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडविण्याविषयी अनास्था आहे. प्रत्येकजण व समाजाचा प्रत्येक घटक आपल्या संकुचित स्वार्थाचाच विचार करीत आहे. दुसर्यांचा विचार करण्याइतका विवेक संपुष्टात आला आहे. ही मोठी चिंतेची गोष्ट आहे.
हिंसा व युद्ध हे शब्द आपल्या देशाच्या सीमेचे परकियांपासून रक्षण करणार्या सॆन्याला लागू आहेत. देशातील आपल्याच समाजाविरुद्ध वा शासनाविरुद्ध वापरणे चुकीचे आहे.
शिवाजी महाराजांनी जुलमी मोंगल राजसत्तेविरुद्ध सशस्त्र लढा दिला.स्वातंत्र्यसॆनिकांनी हिंसेचा वापर परकियांना हाकलून स्वातंत्र्य मिळविताना केला. आपल्या घरादाराची वा नातेवाईकांची पर्वा न करता आपल्या प्राणांचीही आहुती दिली. त्या सर्व स्वातंत्र्यसॆनिकांचा आपल्याला अभिमान आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या चरित्रातून देशासाठी व समाजासाठी वाटेल तो त्याग करण्याची प्रेरणा मिळते. यामुळे त्यांचा शिक्षणात समावेश आवश्यक आहे. मात्र त्यांनी वापरलेल्या पद्धती देशान्तर्गत समस्यांच्या निवारणासाठी निषिद्ध असून अहिंसा व शांततेच्या मार्गाचाच वापर करणे इष्ट्च नव्हे तर बंधनकारक आहे.
येथे शिक्षकाची भूमिका फार महत्वाची आहे. आपल्या देशात व आपल्या समाजात दुसर्या गटाच्या व्यक्तींवर हल्ले करणे वा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, आपल्याच समाजाला आपल्या मागण्यांसाठी वेठीला धरणे चुकीचे आहे व इतरांनीही असे मार्ग वापरल्यास आपलीही कोंडी होऊ शकते, आपलेही नुकसान, आरोग्यास धोका व आपल्याच भावी पिढ्यांवर चुकीचे संस्कार होऊ शकतात याची जाणीव त्यांना द्यावयास हवी.
म्हणूनच सामाजिक कार्यकर्ते एस. एम. जोशी, साने गुरुजी, अण्णा हजारे, मेधा पाटकर व गंगा शुद्धीकरणासाठी सध्या आमरण उपोषणाला बसलेले डॉ. जी. डी आगरवाल यांची उदाहरणे विद्यार्थ्यांना देऊन त्यांना सामाजिक हिंसा वा नासधूस यापासून परावृत्त केले पाहिजे. कितीही महत्वाचे कारण असो, केवढाही अन्याय झाला असो, देशात घटने आपल्याला फक्त अहिंसा व शांततेच्या मार्गांचाच वापर करण्याची मोकळीक दिली आहे.
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान हे शासनाचे वा राज्यकर्त्यांचे नुकसान नसते ते आपलेच नुकसान असते. आपल्याच समाजाला वेठीला धरून वेळ, पॆसा व आरोग्याचे आपण नुकसान केले तर ते आपल्यालाच भरावे लागते. याचे भान असणे जरूर आहे. समाजातील प्रत्येक घटक जर अशी अडवणुकीचे वा हिंसाचाराचे मार्ग अनुसरू लागला तर सारे सामाजिक स्वास्थ्य बिघडून जाईल. व देशात वा राज्यात अराजकता माजेल. परिणामी राज्य व देश विकासाच्या चढणीपेक्षा विनाशाच्या दरीत लोटला जाईल व याचा फायदा शत्रुराष्ट्रालाच होणार आहे. हे विद्यार्थ्यांना पटवून नवी समाज व देशप्रेमी पिढी करण्याचे अवघड कार्य आजच्या शिक्षकांना करावे लागणार आहे.