फ्लॅश प्रोग्रॅमिंगसाठी अ‍ॅक्शनस्क्रिप्ट

फ्लॅशच्या साहाय्याने आकर्षक जाहिराती तयार करता येतात हे लक्षात आल्यावर फ्लॅश तंत्रज्ञानाकडे जाहिरातक्षेत्राचे लक्ष वळले. फ्लॅशचा उपयोग करून आपल्या उत्पादनाची वा सेवेची जाहिरात इंटरनेटच्या माध्यमातून करण्यासाठी पैसा उपलब्ध झाल्याने फ्लॅश तंत्रज्ञानातील सुधारणांस अधिक गती मिळाली. कार्टून फिल्म तयार करताना पूर्वी ज्याप्रमाणे आर्टिस्ट अनेक चित्रे काढत असत, त्याप्रमाणे अनेक लेअर्स व फ्रेम्सवर आकृत्या, चित्रे व मजकूर घालून त्यापासून आकर्षक फ्लॅश मुव्ही करण्याचे तंत्र अनेक व्यावसायिकांनी हस्तगत केले. आजही या पद्धतीने जाहिराती तयार करून देश परदेशातील कामे करणार्‍या कंपन्या भरपूर नफा मिळवीत आहेत.

मात्र अशा पद्धतीमध्ये फ्लॅश मुव्ही करण्यास फार वेळ लागतो. कुशल चित्रकाराची वा ग्राफिक डिझायनरची आवश्यकता असते व केलेल्या मुव्हीत बदल करणे कठीण असते. यावर उपाय म्हणून फ्लॅश मुव्ही करण्याचे काम प्रोग्रॅम लिहून करता यावे यासाठी प्रयत्न सुरू झाले. यातूनच अ‍ॅक्शनस्क्रिप्टचा जन्म झाला.

व्हेक्टर व रास्टर इमेज 
चित्रांमध्ये दोन प्रकार असतात. एक व्हेक्टर इमेज व दुसरा रास्टर इमेज. चौकोन, त्रिकोण,वर्तुळ यासारख्या आकृत्या काढण्यासाठी त्याचे गणिती सूत्र वापरता येते. याना व्हेक्टर इमेज असे म्हणतात. याउलट फोटोमध्ये चित्रातील प्रत्येक बिंदूला महत्व असते व त्या बिंदूंच्या गुणविशेषांमुळे पूर्ण चित्र साकार होत असते. अशा चित्राला रास्टर इमेज असे म्हणतात. व्हेक्टर इमेजेस काढण्यासाठी गणिती सूत्र वापरावे लागत असल्याने त्यास खूप कमी मेमरी लागते. तसेच त्यात बदलही सहज करता येतात. रास्टर इमेजमध्ये स्थान, आकार व रंगात बदल करता येत असला तरी गणिती सूत्रांचा फारसा उपयोग करता येत नाही. अ‍ॅक्शनस्क्रिप्टमध्ये व्हेक्टर इमेजेस तयार करणे वा त्यात हवे तसे हवे तेव्हा बदल करणे शक्य असते. रास्टर इमेजच्या बाबतीत मात्र यावर मर्यादा पदतात.
अ‍ॅक्शनस्क्रिप्ट - १
अ‍ॅक्शनस्क्रिप्ट - १ मध्ये चित्रातील बदल वा कृती याविषयीचा प्रोग्रॅम संबंधित फ्रेममध्ये समाविष्ट केला जात असे. त्यामुळे प्रोग्रॅमचे अनेक तुकडे फ्लॅश मुव्हीमध्ये अनेक ठिकाणी विखुरलेले असत व त्यामुळे प्रोग्रॅम समजणे वा त्यात बदल करणे अवघड व जिकीरीचे काम असे.
अ‍ॅक्शनस्क्रिप्ट - २
अ‍ॅक्शनस्क्रिप्ट - २ मध्ये फ्लॅश मुव्हीतील सर्व प्रोग्रॅम एकत्र एकाच ठिकाणी लिहिण्याची सोय उपलब्ध झाली. एवढेच नव्हे तर प्रोग्रॅमची फाईल .as या दुय्यम नावाने वेगळी काढून ऊप पद्धतीने क्लास व ऑब्जेक्टच्या परिभाषेत वापरता येऊ लागली. साहजिकच ही भाषा शिकण्यासाठी फ्लॅश सॉफ्टवेअर तसेच प्रोग्रॅमिंग यांचा अभ्यास असणे आवश्यक झाले. मात्र या पद्धतीने केलेली फ्लॅश मुव्ही वापरणे वा त्यात बदल करणे सोपे झाले.
अ‍ॅक्शनस्क्रिप्ट - ३ 
अ‍ॅक्शनस्क्रिप्ट - ३ मध्ये फ्लॅश मुव्हीसाठी लागणार्‍या सर्व फाईल, डाटा व इतर साधने यांचे xml फाईलच्या स्वरुपात संकलन करून ती अधिक व्यवस्थित, फ्लेक्झीबल ( बदल करण्यास सोपी) व मेमरीचा सुयोग्य उपयोग करणारी बनविण्यात आली.

फ्लॅशचा उपयोगही केवळ जाहिरातीसाठी न राहता शिक्षणासाठी व डाटाबेसवर आधारित माहिती विश्लेषणासाठी एक प्रभावी रॅपिड वेब अ‍ॅप्लिकेशनच्या स्वरूपात होऊ लागला आहे.

नजिकच्या भविष्यकाळात त्रिमिती तंत्रज्ञानाच्या आधारे बांधकाम वा अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रकल्पांचे इंटरनेटच्या माध्यमातून सादरीकरण करण्यासाठी फ्लॅश / फ्लेक्स आधारित तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. यासाठी हे तंत्रज्ञान शिकणे फायद्याचे ठरणार आहे. ज्ञानदीपने या क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून सध्या परदेशातील एका महत्वाकांक्षी प्रकल्पावर ज्ञानदीपमध्ये काम चालू आहे.